दिल्ली सरकारमध्ये सिसोदियांच्या अटकेनंतर खांदेपालट झाली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी आप आमदार सौरभ भारद्वाज आणि आतिशी यांच्या नावाची शिफारस उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांच्याकडे केली आहे. तर तुरुंगात असलेल्या दोन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे.
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांचा राजीनामा सक्सेना यांनी स्वीकारला आहे. आपचे आमदार सौरभ भारद्वाज केजरीवाल सरकारमध्ये मंत्री होणार आहेत. आतिशी यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. अरविंद केजरीवाल यांनी या दोघांना मंत्री म्हणून नियुक्त करण्याची फाइल उप राज्यपालांकडे पाठवली आहे.
सुप्रीम कोर्टाने दणका दिल्यानंतर मनिष सिसोदिया यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच तुरुंगात असलेल्या सत्येंद्र जैन यांनी देखील मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे पाठविला होता. हे दोन्ही राजीनामे उपराज्यपालांकडे पाठविण्यात आले होते.
मनीष सिसोदिया यांच्याकडील मंत्रिपदे ही दिल्ली सरकारचे मंत्री कैलाश गेहलोत आणि राजकुमार आनंद यांच्यात वाटली जाणार आहेत. सत्येंद्र जैन यांच्या अटकेनंतर त्यांच्याकडील सहा खाती सिसोदियांकडे गेली होती. जवळपास नऊ महिन्यांनंतर जैन यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.