श्रीनगर: पत्रकार शुजात बुखारी यांच्या मारेकऱ्यांची ओळख पटली आहे. बुखारी यांच्यावर हल्ला करणाऱ्या तीनजणांची ओळख पटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यातील दोघे दक्षिण काश्मीरचे असून एकजण पाकिस्तानचा आहे. या हल्ल्यासंदर्भात नावेद जट्ट याचं नावदेखील समोर आलं आहे. जट्ट हा लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आहे. मात्र याबद्दलची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुजात यांच्या हत्येमागे पाकिस्तानचं मोठं कारस्थान असण्याची शक्यता आहे. सध्या सुरक्षा यंत्रणांकडून याची पडताळणी सुरू आहे. या हत्याकांडात सहभागी असलेल्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. तर एसआयटी आणि तपास यंत्रणांकडून तिघांचा शोध सुरू आहे. शुजात यांच्या हत्येच्या कटात एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा सहभाग असल्याची माहितीदेखील समोर आली आहे. मात्र जम्मू-काश्मीर पोलीस किंवा इतर कोणत्याही तपास यंत्रणांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. रायझिंग काश्मीरचे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्येमागे पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात असावा, अशी शक्यता लेफ्टनंट जनरल ए. के. भट्ट यांनी काही दिवसांपूर्वीच वर्तवली होती. काश्मीर खोऱ्यातील एका स्थानिक वृत्तवाहिनीशी संवाद साधताना भट्ट यांनी हा अंदाज व्यक्त केला होता. यानंतर हल्ल्यात सहभागी असलेल्या एका दहशतवाद्याची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं. त्यानंतर हल्ल्याचा तपासासाठी एका विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. याची जबाबदारी श्रीनगरच्या पोलीस उपमहानिरीक्षकांकडे सोपवण्यात आली आहे.
पत्रकार शुजात बुखारी हत्या प्रकरण: तीन हल्लेखोरांची ओळख पटली; एकजण पाकिस्तानी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 7:59 PM