नवी दिल्ली - सध्या इंटरनेटच्या माध्यमातून अनेक जण सोशल मीडियावर सक्रीय असतात. ट्विटर, फेसबुक या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक एकत्र येतात. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचं माध्यम म्हणजे सोशल मीडिया आहे. त्यामुळे राजकीय नेते मोठ्या प्रमाणात या माध्यमाचा वापर करताना दिसतात. सोमवारी अचानक नरेंद्र मोदींनी केलेल्या एका ट्विटमुळे खळबळ माजली होती. मात्र, मंगळवारी नरेंद्र मोदींनी याबाबत पुन्हा ट्विट करुन नवीन खुलासा केला आहे. मोदींच्या या ट्विटनंतर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधींनी संताप व्यक्त केला आहे.
राहुल गांधी यांनी मोदींना लक्ष्य करत, बंद करा तुमचा सोशल मीडियावरील खेळ, असे म्हटले. देशातील महत्वाच्या विषयांकडे लक्ष द्या. भारत सध्या गंभीर परिस्थितीचा सामना करतोय, सध्या देशापुढे कोरोना व्हायरसचं सर्वात मोठं संकट आहे, त्यावर उपाय करण्याचं बघा, असे म्हणत राहुल यांनी मोदींना लक्ष्य केले. तसेच, चीनच्या प्रधानमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आलेला व्हिडीओही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी ट्विट करत, ८ मार्च, रविवारी जागतिक महिला दिन असल्याने त्यादिवशी माझं सोशल मीडियावरील अकाऊंट महिलांसाठी समर्पित करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलंय. तसेच, ज्या महिलेकडून आपल्या प्रेरणा मिळते तिची यशस्वी गाथा येथे मांडा, लाखो महिलांना प्रेरणा देईल अशा स्टोरी शेअर करा, यासाठी #SheIndpriesUs हा हॅशटॅग वापरा असं आवाहन त्यांनी लोकांना केलं आहे.
मोदींच्या या ट्विटनंतर राहुल गांधींनी ट्विट करुन आपला राग व्यक्त केला आहे. कारण, मोदींच्या पहिल्या ट्विटनंतर राहुल गाधींनी ट्विट करुन मोदींना सल्ला दिला होता. मात्र, मोदींच्या आजच्या ट्विटनंतर, सोशल मीडिया सोडणार असल्याचं मोदींचं ट्विट केवळ फिरकी घेण्याचा एक भाग असल्याचं स्पष्ट झालंय.