राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर सोमवारी संसदेत वादळी चर्चा झाली. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभाग घेतला. यावेळी भाषण करत असताना मल्लिकार्जुन खर्गे हे भाजपाच्या एका नेत्यावर खूप संतापले. तसेच त्यांनी या नेत्याला खडेबोल सुनावले. मल्लिकार्जुन खर्गे यांचं भाषण सुरू असतानाच भाजपा खासदार नीरज शेखर यांनी मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरून खर्गे यांनी नीरज शेखर यांना खडसावले.
मल्लिकार्जुन खर्गे हे डॉलरच्या तुलनेत घसरत असलेल्या रुपयाच्या किमतीच्या प्रश्नावर बोलत होते. त्याचदरम्यान, नीरज शेखर यांनी मध्येच काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मल्लिकार्जुन खर्गे हे चांगलेच भडकले. ते म्हणाले की, ‘’तुझ्या बापाचाही मी असाच सहकारी होतो. त्याला घेऊन फिरलो. चूप, चूप, तू गप्प बस’’, असे मल्लिकार्जुन खर्गे रागाच्या भरात म्हणाले.
या भाषणात खर्गे म्हणाले की, वित्तमंत्री निर्मला सीतारमण ह्या मनुस्मृतीमुळे नव्हे तर संविधानामुळेच २०२५-२६ सालचा अर्थसंकल्पा सादर करू शकल्या. यावेळी खर्गे यांनी नरेंद्र मोदी यांच्या ११ वर्षांच्या शासन काळावरही टीका केली. ते म्हणाले की, विकास, रोजगार, शेतकऱ्यांचं कल्याण आणि केंद्रीय व्यवस्था या सर्व पातळ्यांवर हे सरकार अपयशी ठरलं.
दरम्यान, राज्यसभेत मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी पंगा घेणारे भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार नीरज शेखर हे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र आहेत. त्यांनी २०१९ मध्ये भाजपात प्रवेश केला होता. तसेच पक्षाने त्यांना राज्यसभा खादार बनवले होते. तत्पूर्वी ते समाजवादी पक्षामध्ये होते. तसेच समाजवादी पक्षाकडून ते राज्यसभा आणि लोकसभेचे खासदार बनले होते.