अहमदाबाद: आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणाला वेग यायला हळूहळू सुरुवात होत असल्याचे दिसत आहे. सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपविरोधात राजकारण सुरू केलेले पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठ देत भाजपमध्ये प्रवेश केला. या धक्क्यातून काँग्रेस सावरतो न सावरतो तोच पक्षाला पुन्हा एक धक्का बसला आहे. काँग्रेसच्या युवा महिला चेहरा असलेल्या श्वेता ब्रह्मभट्ट यांनी पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
विशेष म्हणजे श्वेता ब्रह्मभट्ट यांनी सन २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे नेते सुरेश पटेल यांना पराभूत केले होते. श्वेता ब्रह्मभट्ट यांनी मणिनगर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. दरम्यान, श्वेता ब्रह्मभट्ट यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यानंतर काही दिवसांतच त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला.
काँग्रेसमध्ये दूरदृष्टीचा अभाव
गुजरात काँग्रेसमध्ये दूरदृष्टीचा अभाव आहे. व्यवस्थापन, नियोजन योग्य पद्धतीने केले जात नाही. ज्या उद्देशाने काँग्रेसमध्ये आले होते, तोच साध्य होत नसल्याने हा निर्णय घेत असल्याचे श्वेता ब्रह्मभट्ट यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच हार्दिक पटेल यांच्यासारख्या नेत्यांना पक्ष कामच करू देत नाही. पक्षाने दिलेली जबाबदारी आणि कामे वरिष्ठ पूर्णत्वास नेऊ देत नाहीत. काँग्रेसमध्ये योग्य पद्धतीने काम करू दिले जात नाही, असा आरोप श्वेता ब्रह्मभट्ट यांनी काँग्रेस पक्षावर केला आहे. काँग्रेसवर टीका करत नसून, आमच्या सूचनांवर विचार केला असता, तर पक्षालाच त्याचा फायदा झाला असता, असे श्वेता ब्रह्मभट्ट यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राष्ट्रहित, राज्यहित, जनहित आणि सामाजिक हित या भावनांनी मी आजपासून एका नव्या अध्यायाची सुरुवात करणार आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशसेवेच्या कार्यात मी एक लहान सैनिक म्हणून काम करेन, असे सांगत हार्दिक पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच एका नव्या अध्यायाची सुरुवात करत आहे. आम्ही दर १० दिवसांनी एक कार्यक्रम करू. ज्यामध्ये काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या आमदारांसह नेत्यांना भाजपमध्ये सहभागी होण्यास सांगितले जाईल. तसेच, पंतप्रधान मोदी हे संपूर्ण जगाची शान असल्याचेही हार्दिक यांनी नमूद केले होते.