ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि,१ - सेन्सॉर बोर्डाच्या फेररचनेसाठी ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या नेतृत्वाखाली सरकारने एक समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये किती जण असणार आहेत आणि कोण याचा खुलासा अद्याप झालेला नाही. पण केंद्र सरकारच्या या निर्णयाचे अभिनेता अनुपम खेर यांनी स्वागत केले आहे.
‘स्पेक्टर’मधील किसिंग सीनला भारताच्या सेन्सॉर बोर्डानं कात्री लावण्याचा प्रकार असो किंवा कस वर्ड्सवर म्हणजे अर्वाच्य भाषेवर बंदी असो, बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांचे अनेक निर्णय वादग्रस्त ठरले. स्पेक्टर सिनेमाला यूए सर्टिफिकेट दिलं त्यानंतर सोशल मीडियावर या प्रकरणाविरोधात जोरदार चर्चा सुरु झाली #SanskariJamesBond या हॅशटॅगसह ट्विटरवर सेन्सॉर बोर्डाची खिल्ली उडवली गेली. भारताचा संस्कारी जेम्स बॉण्ड कसा असेल? यावरही सोशल मीडियात चर्चा रंगली गेली. त्याचप्रमाणे पहलाज निहलानी यांनी २८ शिव्यांची यादी करून ती हिंदी चित्रपटसृष्टीतल्या चित्रपटकर्त्यांना पाठवली होती त्यावर ही नाराजीचे सुर आवळले गेले.
गेल्या वर्षाच्या सुरवातीस ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक पहलाज निहलानी यांची सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली होती, त्यांच्या मंडळात नऊजणांची नियुक्ती करण्यात आली होती, त्यामध्ये अशोक पंडित, चंद्रप्रकाश द्विवेदी, मिहिर भुत्ता, सय्यद अब्दुल बारी, रमेश पतंगे, जॉर्ज बाकर, जीविता, एस. व्ही. शेखर आदींचा समावेश आहे.
यापुर्वी, २०१५ च्या जानेवारीमध्ये डेरा सच्चा, सौदाचे बाबा राम रहीम यांच्या `मेसेंजर ऑफ गॉड’ चित्रपटाला `एफसीएटी’कडून परस्पर मंजुरी मिळाल्याने संतापलेल्या सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष लीला सॅमसन यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.