नवी दिल्ली - सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेसने महाभियोग प्रस्ताव आणल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी या प्रस्तावाचे जोरदार समर्थन केले होते. मात्र आता कपिल सिब्बल यांचा 8 वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओमध्ये कपिल सिब्बल हे एखाद्या न्यायाधीशावर महाभियोग प्रस्ताव आणणे हे असंवैधानिक असल्याचे सांगताना दिसत आहेत. हा व्हिडिओ 2010 सालचा असून, एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत कपिल सिब्बल म्हणतात, राजकारणी न्यायाधीशांचे भवितव्य ठरवू लागले तर ती बाब देशासाठी सर्वात मोठे नुकसानकारक असेल." सिब्बल त्यावेळी काँग्रेस सरकारमध्ये मंत्री होते. त्यावेळी कोलकाता हायकोर्टाचे न्यायाधीश सौमित्र सेन यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्यात आला होता. सेन यांच्यावर आर्थिक अनियमिततेचे आरोप झाले होते. हा प्रस्ताव राज्यसभेत पारितही झाला होता. मात्र लोकसभेमध्ये हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. जर लोकसभेमध्ये हा प्रस्ताव मंजूर झाला असता तर सौमित्र सेन हे महाभियोग होऊन पदावरून हटवण्यात आलेलेल पहिले न्यायधीश ठरले असते. दरम्यान, काँग्रेसने सात पक्षांच्या 64 खासदारांच्या सह्या असलेला सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी नुकताच फेटाळला आहे. दरम्यान, हा महाभियोग प्रस्ताव फेटाळण्यात आल्यानंतर कपिल सिब्बल यांनी उपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे म्हटले होते.
तेव्हा सिब्बल महाभियोग प्रस्तावाला म्हणाले होते असंवैधानिक, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 4:02 PM