नवी दिल्ली : ‘आयएनएक्स मीडिया’ कंपनीतील थेट परकीय गुंतवणुकीत झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ‘मनी लॉड्रिंग’च्या आरोपावरून अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) अटकेत असलेले माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांची येथील विशेष न्यायालयाने बुधवारी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यामुळे ७४ वर्षांच्या या ज्येष्ठ काँग्रेस नेत्याला आजारी असूनही तिहार तुरुंगातच मुक्काम करावा लागणार आहे.
आधी दिलेला एक आठवड्याचा रिमांड संपल्याने ‘ईडी’ने चिदम्बरम यांना विशेष न्यायालयापुढे हजर केले व आणखी एक दिवसाची कोठडी देण्याची विनंती केली. मात्र ती मान्य न करता न्यायालयाने चिदम्बरम यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली.दरम्यान, प्रकृतीच्या कारणावरून अंतरिम जामीन मिळावा यासाठी चिदम्बरम यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका केली आहे. दोनच दिवसांपूर्वी पोटाच्या विकाराने खूप त्रास झाल्याने त्यांना तपासणीसाठी ‘एम्स’मध्ये नेण्यात आले होते. आता आपल्याला हैदराबाद येथील ‘एशियन इन्स्टिट्यूट आॅफ गॅस्ट्रोएंटेरॉलॉजी’ (एआयजी) मधील आपल्या खासगी डॉक्टरकडून तपासणी करून सल्ला घेण्यासाठी अंतरिम जामिनावर सोडावे, अशी त्यांनी उच्च न्यायालयास विनंती केली आहे.