बंगळुरु : कर्नाटकमधील सिद्धगंगा मठाचे मठाधीश श्री. शिवकुमार स्वामी यांचे सोमवारी निधन झाले. ते 111 वर्षांचे होते.
श्री. शिवकुमार स्वामी यांच्यावर गेल्या महिन्यात 8 डिसेंबरला ऑपरेशन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या फुफुसात संसंर्ग झाला होता. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, सोमवारी सकाळी 11 वाजून 44 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
श्री. शिवकुमार स्वामी यांच्या निधनाची बातमी समजताच कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी मठात दाखल झाले असून त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच, त्यांनी राज्यात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. याशिवाय, शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.
श्री. शिवकुमार स्वामी यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी शोक व्यक्त केला आहे. तर, मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यासह, कर्नाटकचे भाजपा अध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा, एम. बी. पाटील, केजे जॉर्ज आणि सदानंद गौडा मठात दाखल झाले आहे. श्री. शिवकुमार स्वामी यांच्यावर उद्या (दि.22) साडेचार वाजता अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत.