कर्नाटकातील राजकीय अस्थिरतेमागे मोदी-शहा, सिद्धरामय्या यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 03:07 PM2019-07-09T15:07:06+5:302019-07-09T15:17:39+5:30

काँग्रेस-जेडीएसचे सरकार अस्थिर करण्याचा डाव असून हे लोकशाही आणि जनमताच्या विरोधात आहे. त्यांच्याकडून आमदारांना पैसा, पद आणि मंत्रीपदाची ऑफर दिली जात आहे असा आरोप सिद्धरामय्या यांनी केला आहे.

Siddaramaiah blames PM Modi, Amit Shah for Karnataka crisis | कर्नाटकातील राजकीय अस्थिरतेमागे मोदी-शहा, सिद्धरामय्या यांचा आरोप

कर्नाटकातील राजकीय अस्थिरतेमागे मोदी-शहा, सिद्धरामय्या यांचा आरोप

ठळक मुद्देकाँग्रेस-जेडीएसचे सरकार अस्थिर करण्याचा डाव असून हे लोकशाही आणि जनमताच्या विरोधात आहे.आमदारांना पैसा, पद आणि मंत्रीपदाची ऑफर दिली जात आहे असा आरोप सिद्धरामय्या यांनी केला आहे. सरकारे अस्थिर करणं ही भाजपाची सवय आहे. हे असंविधानिक असून लोकांनी भाजपाचे सरकार बनवण्याचा जनादेश दिलेला नाही.

बंगळुरू - कर्नाटकमधील काँग्रेस-जनता दल (एस)च्या सत्ताधारी आघाडीतील 13 आमदारांनी शनिवारी राजीनामा दिल्याने आधीपासूनच डामाडौल अवस्थेत असलेले एच. डी. कुमारस्वामी यांचे सरकार कोसळण्याची चिन्हे दिसत आहेत. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कर्नाटकातील राजकिय घडामोडींमागे राज्यातील भाजपाच्या नेत्यांचाच फक्त सहभाग नाही तर राष्ट्रीय स्तरावरील नेते अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्यांचाही सहभाग असल्याचं म्हटलं आहे.

काँग्रेस-जेडीएसचे सरकार अस्थिर करण्याचा डाव असून हे लोकशाही आणि जनमताच्या विरोधात आहे. त्यांच्याकडून आमदारांना पैसा, पद आणि मंत्रीपदाची ऑफर दिली जात आहे असा आरोप सिद्धरामय्या यांनी केला आहे. तसेच सरकारे अस्थिर करणं ही भाजपाची सवय आहे. हे असंविधानिक असून लोकांनी भाजपाचे सरकार बनवण्याचा जनादेश दिलेला नाही. जनतेने आम्हाला सर्वाधिक मतं दिली आहेत. काँग्रेस आणि जदयूने मिळून 57 टक्के मतं मिळवली आहेत.


सिद्धरामय्या यांनी आमदारकीचे राजीनामे देऊन भाजपासोबत हातमिळवणी करणाऱ्या बंडखोर काँग्रेस आमदारांचे पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल सदस्यत्व रद्द करण्यात येणार आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांकडे आम्ही त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणार आहोत असं म्हटलं आहे. याआधी सिद्धरामय्या यांनी कर्नाटकात सर्व काही ठिक असून कुमारस्वामी सरकारला कोणताही धोका नसल्याचा दावा केला होता. भाजपाचे हे ऑपरेशन लोट्स असून आमदारांच्या राजीनाम्यामागे भाजपाचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.


कर्नाटकातील राजकीय नाट्य आता अखेरच्या टप्प्यात आलं आहे. मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळातील काँग्रेस, जेडीएसच्या सर्व सदस्यांनी राजीनामा दिल्यानं कर्नाटकमधील नाट्यावर पडदा पडेल, अशी अपेक्षा होती. मात्र बंडखोर आमदार अद्यापही अडून बसले आहेत. आमदारकीचा राजीनामा देणारे बंडखोर नेते आज गोव्याला जाणार होते. मात्र त्यांनी अचानक ही योजना रद्द केली आणि मुंबईत थांबण्याचा निर्णय घेतला. सध्या मुंबईतील अज्ञातस्थळी सर्व बंडखोर आमदार वास्तव्यास आहेत. त्यामुळे मुंबई पुन्हा एकदा कर्नाटकातील राजकीय नाट्याच्या केंद्रस्थानी आली आहे. 


काँग्रेस, जेडीएसच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिल्यानंतरही बंडखोर आमदारांनी तलवार मान्य केलेली नाही. त्यामुळे भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शनिवारपासून कर्नाटकमध्ये राजकीय नाट्य जोरात आहे. काँग्रेस, जेडीएसच्या 13 आमदारांनी राजीनामा दिल्यानं सत्ता नाटक सुरू झालं. कर्नाटकात कोणाचं सरकार येणार, हे ठरवू शकणारे हे आमदार सध्या मुंबईत आहेत. ते आज गोव्याला जाणार होते. मात्र ऐनवेळी त्यांनी ही योजना रद्द करत मुंबईत अज्ञातस्थळी राहण्याचा निर्णय घेतला.


बंडखोर आमदारांना मंत्रिपदांची ऑफर देण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांनी केला. मात्र तो निष्फळ ठरला. सोमवारी सकाळी हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत बंडखोर आमदारांना मंत्रिपदांची ऑफर देण्यात आली. मात्र सध्याचं काँग्रेस सरकार अस्थिर असल्याचं म्हणत या आमदारांनी मंत्रिपदं स्वीकारण्यास नकार दिला. बंडखोर आमदार भाजपा सरकारमध्ये सामील होण्यास उत्सुक असल्याचं सांगितलं जात आहे. या आमदारांचं वास्तव्य असलेल्या वांद्र्यातील सोफिटेल हॉटेलवर भाजपाकडून नजर ठेवली जात असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात होती.
 

Web Title: Siddaramaiah blames PM Modi, Amit Shah for Karnataka crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.