नवी दिल्ली: कर्नाटकात सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री आणि डी. के. शिवकुमार हे उपमुख्यमंत्रिपदाची आज शपथ घेतली आहे. याशिवाय अनेक आमदारांनाही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. हा शपथविधी सोहळा बेंगळुरूच्या कांतीराव स्टेडियमवर सुरू आहे.
या सोहळ्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी, अनेक मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला, अभिनेता कमल हसन देखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहेत.
आता आश्वासने पूर्ण करण्याचे असेल आव्हान
काँग्रेसने सर्व घरांना २०० युनिट मोफत वीज (गृहज्योती), प्रत्येक कुटुंबाच्या महिला प्रमुखाला २,००० रुपये मासिक मदत (गृहलक्ष्मी), दारिद्र्यरेषेखालील प्रत्येक सदस्याला १० किलो तांदूळ (अण्णा भाग्य) मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे. पदवीधर तरुणांसाठी दरमहा रु. ३,००० आणि डिप्लोमाधारकांसाठी रु. १,५०० (दोघेही १८ ते २५ वयोगटांतील) दोन वर्षांसाठी (युवानिधी) आणि महिलांसाठी सार्वजनिक वाहतूक बसमध्ये मोफत प्रवास (शक्ती).
किती होणार मंत्री?
कर्नाटकात ३४ जण मंत्री होऊ शकतात. या पदांसाठी अनेक इच्छुक आहेत. जनतेचा आवाज हाच कर्नाटक सरकारचा आवाज असेल, असेही ते म्हणाले. भाजप आणि जेडीएसच्या नेत्यांनाही निमंत्रित केले असल्याचे त्यांनी सांगितले.
सिद्धरामय्यांकडे नाही मोबाईल
अतिशय साधे राहणीमान असलेल्या सिद्धरामय्या यांच्याकडे मोबाईल नाही. १९८५ मध्ये ३८ व्या वर्षी ते मंत्री झाले होते. राजकीय कारकिर्दीत त्यांनी विधानसभेच्या १२ निवडणुका लढल्या आहेत. यात ते नऊ वेळा विजयी झाले. सिद्धरामय्या १० वर्षे होईपर्यंत शाळेत जाउ शकले नव्हते.