सिद्धरामय्या सीएम, शिवकुमार डीसीएम; शनिवारी होणार शपथविधी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 06:36 AM2023-05-19T06:36:49+5:302023-05-19T06:38:09+5:30
सिद्धरामय्या यांची विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेऊन सत्तास्थापनेसाठी दावा सादर केला.
नवी दिल्ली : तीन दिवसांच्या मॅरेथॉन बैठका आणि विचारमंथनानंतर, काँग्रेसने गुरुवारी मुख्यमंत्रिपदासाठी सिद्धरामय्या यांच्या नावाची घोषणा सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी केली. नव्या सरकारमध्ये एकमेव उपमुख्यमंत्री असतील. तसेच लोकसभा निवडणुकीपर्यंत शिवकुमार हेच प्रदेशाध्यक्षपदही सांभाळतील, असेही ते म्हणाले. २० मे रोजी दुपारी शपथविधी होणार असून, यावेळी अनेक मंत्रीही शपथ घेणार आहेत. सिद्धरामय्या यांची विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेऊन सत्तास्थापनेसाठी दावा सादर केला.
शपथविधीसाठी पवार, ठाकरेंनाही निमंत्रण
काँग्रेसचे के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, शपथविधीसाठी समविचारी पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह अनेकांना शपथविधीसाठी निमंत्रण गेल्याचे वृत्त आहे.
सिद्धरामय्या मुख्यमंत्री होतील आणि शिवकुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद येईल तसेच ते एकमेव डीसीएम असतील असे वृत्त लोकमतने दिले होते. ते तंतोतंत खरे ठरले.