पहिली दोन वर्षे सिद्धरामय्या, नंतर शिवकुमार मुख्यमंत्रिपदी; काँग्रेस नेतृत्वाने बनविला फॉर्म्युला, दिल्लीत आज बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 06:53 AM2023-05-16T06:53:44+5:302023-05-16T06:55:03+5:30
मुख्यमंत्रिपदी कुणाची निवड करावी, याबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी रात्री पाठवलेल्या निरीक्षकांनी आमदारांशी चर्चा केली.
आदेश रावल -
नवी दिल्ली : कर्नाटकात मुख्यमंत्रिपदी कोण, याचा फैसला येत्या २४ तासांत होण्याची शक्यता असून, दोन वर्षे सिद्धरामय्या, तर अखेरचे तीन वर्षे डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्री होतील, असा फॉर्म्युलाही तयार केला आहे.
मुख्यमंत्रिपदी कुणाची निवड करावी, याबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी रात्री पाठवलेल्या निरीक्षकांनी आमदारांशी चर्चा केली. याबाबतचा निर्णय खरगे यांच्यावर सोपवल्याचा ठराव मंजूर केला. या फॉर्म्युल्यानुसार मंगळवारी शिवकुमार यांच्यापुढे प्रस्ताव मांडला जाईल. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली जाईल. त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
८५ आमदारांचा सिद्धरामय्या यांना पाठिंबा
- निरीक्षकांनी आमदारांकडून गोपनीय मतदान करून घेतले. यात असे दिसून आले की, सर्वाधिक म्हणजे
८५ आमदारांचे समर्थन सिद्धरामय्या यांना आहे, तर कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना ४५ मते मिळाली आहेत, तर ६ आमदारांनी सांगितले की, काँग्रेस पक्ष नेतृत्व घेईल तो निर्णय मान्य असेल.
- सरचिटणीस रणदीप सिंह सुरजेवाला यांनी सोमवारी अहवाल अध्यक्षांना सुपूर्द केला. मंगळवारी ते काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांची भेट घेतील.
सिद्धरामय्या दिल्लीत, शिवकुमार आज पोहोचणार
मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या सोमवारी दिल्लीत पोहोचले, तर पोटाच्या संसर्गाचे कारण देत कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी दिल्लीचा प्रस्तावित दौरा रद्द केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. परंतु, मंगळवारी सकाळी ते दिल्लीत पोहोचणार असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी स्पष्ट केले. त्यानंतर त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे.