बंगळुरू : लोकसभा निवडणुकांच्या काळात प्राप्तिकर खात्याच्या धाडींविरोधात निदर्शने केल्याबद्दल कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या, माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी, बंगळुरूचे तत्कालीन पोलीस आयुक्त टी. सुनीलकुमार व अन्य पोलीस अधिकारी, तसेच काही काँग्रेस, जनता दल (एस) नेत्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यासंदर्भात मल्लिकार्जुन ए. या कार्यकर्त्याने बंगळुरू न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला होता. निदर्शनांत सामील असलेले नेते, अधिकारी यांच्यावर केंद्र सरकारच्या विरोधात युद्ध छेडण्याचा प्रयत्न करणे, गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे, अशा आरोपांखाली भारतीय दंडसंहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात यावा, असा आदेश न्यायालयाने पोलिसांना दिला.प्राप्तिकर खात्याच्या धाडींविरोधातील निदर्शनप्रकरणी तत्कालीन उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर, डी.के. शिवकुमार, कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडू राव, तत्कालीन पोलीस उपायुक्त राहुलकुमार, डी. देवाराजू धाडींबद्दल प्रतिक्रिया करणारे सर्व निवडणूक अधिकारी यांच्यावरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. काँग्रेस, जनता दल (एस) या पक्षांच्या नेत्यांच्या निवासस्थानी प्राप्तीकर खात्याने टाकलेल्या धाडींविरोधात बंगळुरूतील या खात्याच्या कार्यालयासमोर दोन्ही पक्षांनी जोरदार निदर्शने केलीहोती.अशा धाडी टाकणार असल्याची आधीच मिळालेली माहिती कुमारस्वामी यांनी उघड केलीहोती.विमानतळावर केंद्रीय राखीव दलाचे अनेक जवान आले असून, मोठ्या प्रमाणावर धाडसत्र सुरू होण्याची शक्यता आहे, असे कुमारस्वामी यांनी २७ मार्च रोजी सांगितले होते. (वृत्तसंस्था)राजकीय हेतूने कारवाई केल्याचा आरोपकाँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार म्हणाले आहेत की, राजकीय हेतूने ही कारवाई करण्यात आली असून, त्याचा मुकाबला आम्ही राजकीय स्तरावरच करू.प्राप्तिकर खात्याच्या कार्यालयात प्रवेश न करता तिथपासून १५० मीटर दूरवर उभे राहून निदर्शने केली होती, असाही दावा त्यांनी केला.
सिद्धरामय्या, कुमारस्वामींवर देशद्रोहाचा गुन्हा, न्यायालयाचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 2:54 AM