मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घेतली सोनिया आणि राहुल गांधींची भेट, उद्या मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 05:09 PM2023-05-26T17:09:18+5:302023-05-26T17:10:21+5:30
मंत्रिमंडळाचा विस्तार शनिवारी दुपारी होईल आणि संध्याकाळपर्यंत विभागांचे वाटप देखील केले जाईल, असे कर्नाटकचे मंत्री केएच मुनियप्पा यांनी शुक्रवारी सांगितले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी दिल्लीत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. दुसरीकडे, मंत्रिमंडळाचा विस्तार शनिवारी दुपारी होईल आणि संध्याकाळपर्यंत विभागांचे वाटप देखील केले जाईल, असे कर्नाटकचे मंत्री केएच मुनियप्पा यांनी शुक्रवारी सांगितले.
मंत्रिमंडळात वरिष्ठांसोबत तरुणांचाही समावेश केला जाईल. चार-पाच मंत्रीपदे वगळता उर्वरित मंत्रिपदाचा विस्तार एका दिवसात केला जाईल, असे केएच मुनियप्पा म्हणाले. तसेच, मंत्रिपदांबाबत वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या हायकमांडकडे काही मागणी केली आहे का, असे माध्यमांनी विचारले असता ते म्हणाले की, सध्या काही सांगणे कठीण आहे. मात्र, आपल्याला वरिष्ठांबरोबरच तरुणांचीही गरज आहे. या दोन्ही गोष्टींचा समतोल साधला पाहिजे.
खात्यांबाबत मंत्री मुनियप्पा म्हणाले की, अद्याप काहीही ठरलेले नाही. उद्या पोर्टफोलिओचा निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. पोर्टफोलिओ शनिवारी संध्याकाळपर्यंत जाहीर केले जाणार आहेत. मुनियप्पा हे कर्नाटकातील देवनहल्लीचे आमदार आहेत. 20 मे रोजी त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासोबत कर्नाटकचे मंत्री म्हणून शपथ घेतली.
आतापर्यंत मंत्रिमंडळात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यासह 10 मंत्रीपदे देण्यात आली आहेत, तर 24 मंत्रीपदे रिक्त आहेत. सध्या मंत्रिपदाची शपथ सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्याशिवाय, डॉ जी परमेश्वरा, मुनियप्पा, केजे जॉर्ज, एमबी पाटील, सतीश जारकीहोळी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा प्रियांक खर्गे, रामलिंगा रेड्डी आणि बीझेड जमीर अहमद खान यांचा समावेश आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मंत्रिपदावरून नेत्यांमध्ये जोरदार चुरस सुरू आहे. आपल्या उमेदवारीवर प्रभाव टाकण्यासाठी नेते काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेत आहेत. दुसरीकडे दिल्लीतच अनेक नेत्यांनी तळ ठोकला आहे.