नवी दिल्ली : कर्नाटकातीलकाँग्रेसचे 'संकटमोचक' अशी ओळख असलेले डी. के. शिवकुमार यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. त्यांच्या अटकेमागे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा हात असल्याची शंका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील यांनी व्यक्त केली आहे.
नलिन कुमार कटिल म्हणाले, "मला शंका आहे की, डी. के. शिवकुमार यांच्याविरोधातील प्रकरणामागे सिद्धरामय्या आहेत. माझ्या मते, डी. के. शिवकुमार यांची होत असलेली भरभराट सिद्धरामय्या यांनी पाहिली होती. त्याच कारणामुळे डी. के. शिवकुमार यांच्या अटकेमागे सिद्धरामय्या असू शकतील."
दरम्यान, 3 सप्टेंबरला डी. के. शिवकुमार यांना सक्तवसुली संचालनालयाने आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी अटक केली आहे. त्यांच्या अटकेवरून कर्नाटकातील राजकीय वातावरण तापले आहे. याआधी 2017 मध्ये डी. के शिवकुमार यांच्या निकटवर्तीयांच्या दिल्लीतील निवासस्थानांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले होते. या छाप्यात 8 कोटी 59 लाखांची बेकायदा रक्कम आढळून आली होती.
(काँग्रेसच्या संकटमोचकावर 'संकट'; शिवकुमार यांना ईडीने केली अटक)
याप्रकरणातील चौकशीदरम्यान डी. के शिवकुमार यांनी खोटी माहिती दिली, असा आरोप करून सक्तवसुली संचालनालयाने त्यांच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे न्यायालयात तक्रार दाखल केली होती. याचबरोबर, डी. के. शिवकुमार यांनी हलावा एजंटमार्फत कोट्यवधी रुपये बदलून घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी समन्स बजावले होते. समन्स रद्द करण्यासाठी डी. के. शिवकुमार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्याने सक्तवसुली संचालनालयाने त्यांना अटक केली आहे.