नवी दिल्ली- कर्नाटक विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. निवडणुकीला फक्त पाच दिवस शिल्लक असताना पक्षांचा प्रचारही जोर धरु लागला आहे. प्रचारसभेदरम्यान दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. आपल्या प्रचार सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आणि कर्नाटकचे भाजपा नेते येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. भाजपाने केलेल्या गंभीर आरोपामुळे सिद्धरामय्या यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा, येडियुरप्पा यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. एकुण सहा पानांची ही नोटीस आहे. सिद्धरामय्या यांनी भाजपाच्या या तीनही नेत्यांविरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे. माफी मागा किंवा १०० कोटींची नुकसान भरपाई द्या असं सिद्धरामय्या यांनी नोटिशीत म्हटले आहे.मोदी, शहा आणि येडियुरप्पा यांनी जाणीवपूर्वक आणि द्वेषभावनेने आपल्याविरोधात खोटी आणि अपमानास्पद विधानं केली. भ्रष्टाचाराचे खोटे आरोपही लावले आहेत. त्यामुळे मानहानीसाठी पंतप्रधान मोदींसह शहा आणि येडियुरप्पा यांनी मानहानीपोटी १०० कोटी रुपयांचा दंड भरावा अन्यथा माझी माफी मागावी, असं सिद्धरामय्या यांनी नोटिसीत म्हटलं आहे.
माफी मागा अन्यथा १०० कोटींचा दावा ठोकणार; मोदी, शहा आणि येडियुरप्पांना सिद्धरामय्यांची कायदेशीर नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2018 7:49 PM