उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थनगरमध्ये फी न भरल्यामुळे निष्पाप विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कडक उन्हात त्यांना शाळेच्या गेटबाहेर बसून ठेवलं. एवढेच नाही तर फी भरण्यासाठी दबाव टाकत त्याचा व्हिडीओही बनवण्यात आला आणि अपमान करण्यात आला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच एकच खळबळ उडाली आहे. शाळा व्यवस्थापकावर कारवाई करण्याची मागणी लोकांनी सुरू केली. सध्या या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
हे संपूर्ण प्रकरण इटावा तहसील परिसरात असलेल्या श्याम राजी हायस्कूलचं आहे, जिथे व्यवस्थापक शैलेंद्र कुमार यांनी फी न भरणाऱ्या मुलांचा व्हिडीओ बनवला, त्यांना शाळेतून बाहेर काढलं आणि शाळेसमोर उन्हात बसवले. आपल्या कृतीचा या शाळकरी मुलांच्या मनावर काय वाईट परिणाम होईल, याचा विचार व्यवस्थापकाने एकदाही केला नाही. व्हिडिओमध्ये मुलं खाली तोंड करून बसलेली दिसत आहेत.
व्हायरल व्हिडीओमध्ये शैलेंद्र कुमार शाळेबाहेर बसलेल्या विद्यार्थ्यांना सांगतो की, तुमच्या पालकांना आधीच कळवलं होतं की, फी जमा होईपर्यंत मुलांना शाळेत पाठवू नका. पण तुम्ही लोक ऐकत नाहीत. मला त्रास देत आहात. त्यामुळे फी न भरणाऱ्या मुलांना मी शाळेतून हाकलून देत आहे. मी हे अगदी कडक शब्दात सांगत आहे. तुम्हाला वाईट वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही जबाबदार आहात, मी नाही. माझ्यावर बँकेचं कर्ज आहे आणि तुम्ही फी भरत नाही. हे असं चालणार नाही.
या प्रकरणी जिल्हा शाळा निरीक्षक सोमारू प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना व्हिडिओबाबत माहिती मिळाली आहे. ज्यामध्ये शाळेची फी न भरल्याने मुख्याध्यापकांनी मुलांना बाहेर बसवल्याचं दिसतं. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या शाळेला आमची मान्यता नाही. मात्र, त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.