सिद्धू...राजकारण कधी सोडताय? मोहालीत झळकले पोस्टर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 04:17 PM2019-06-21T16:17:25+5:302019-06-21T16:20:20+5:30
मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग व नवज्योत सिंग सिद्धू यांचे अजिबात पटत नाही.
मोहाली : लोकसभा निवडणुकीमध्ये नेत्यांनी दिलेली आश्वासने, आव्हाने यांचा लोकांना विसर पडल्याचे दिसत असतानाच नवज्योतसिंग सिद्धूंच्या एका वक्तव्याची पोस्टर अख्ख्या मोहालीमध्ये झळकू लागली आहेत. यामध्ये त्यांना राजकारण कधी सोडताय असा प्रश्न विचारण्यात आला आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत अमेठीमधून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपाच्या मंत्री स्मृती इराणी या उभ्या राहिल्या होत्या. यावेळी इराणी यांनी राहुल गांधींना अमेठीतून हरविणार असल्याचा दावा केला होता. त्यावर अमेठीतील सभेत नवज्योत सिंग सिद्धू यांनी राहुल गांधीच विजयी होतील आणि तसे न झाल्यास आपण राजकीय संन्यासच घेऊ, अशी घोषणा केली होती. आता सिद्धुंनी दिलेला शब्द पाळावा, अशा आशयाचे पोस्टर मोहालीमध्ये लावण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग व नवज्योत सिंग सिद्धू यांचे अजिबात पटत नाही. यामुळे नेमके हे पोस्टर कोणी लावलेत, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
Punjab: Posters with Congress leader Navjot Singh Sidhu's picture stating,'When are you quitting politics? Time to keep your words. We are waiting for your resignation,' seen in Mohali. pic.twitter.com/DtJN7dCRUw
— ANI (@ANI) June 21, 2019
सिद्धू तुमच्या राजीनाम्याची वेळ झाली आहे. दिलेला शब्द पाळा. राजीनाम्याची वाट पाहतोय, अशा आशयाचे पोस्टर लागले आहेत.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवज्योत सिद्धू यांना पंजाबमध्ये प्रचार करू नका, असे सांगितले होते. त्यावर पंजाबमध्ये काँग्रेसचा विजय झाल्यास त्याचे श्रेय कॅप्टनना मिळेल. पण काँग्रेस पराभूत झाल्यास अमरिंदर सिंग यांना त्याची जबाबदारी घ्यावी लागेल, असे विधान सिद्धू यांनी केले होते. तेव्हापासून दोघांमधील वाद अधिकच उफाळला. त्यात पंजाबमध्ये काँग्रेसला चांगले यशही मिळाले आहे.