चंदिगड : पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्याकडील स्थानिक स्वराज्य संस्थांचे खाते काढून घेऊन त्यांना ऊर्जामंत्री करण्यात आले आहे. मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांच्याशी सिद्धू यांचे मतभेद विकोपाला गेले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकांनंतर पंजाब राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या पहिल्या बैठकीला हजर न राहता त्याऐवजी सिद्धू यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.
निवडणुकांत पंजाबच्या शहरी भागामध्ये काँग्रेसच्या खराब कामगिरीमुळे सिद्धू यांच्याकडे असलेले स्थानिक स्वराज्य संस्थांचे खाते काढून घेण्याचा विचार पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी बोलून दाखविला होता. मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित न राहाता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सिद्धू यांनी पत्रकारांना सांगितले की, मला कोणीही गृहित धरू शकत नाही. गेली ४० वर्षे विविध क्षेत्रात सक्रिय आहे.
ऐन निवडणुकांतही वाद चव्हाट्यावरपंजाबमध्ये १३ पैकी आठ लोकसभा जागा काँग्रेसने जिंकल्या. शिरोमणी अकाली दल-भाजप युतीने चार तर आपने एक लोकसभा जागा जिंकली होती. निवडणुकांच्या प्रचारातही नवज्योतसिंग सिद्धू व मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्यातील मतभेद उफाळून आले होते.पंजाबमध्ये काँग्रेसच्या स्टार प्रचारकांमध्ये आपले नाव नसल्याबद्दल सिद्धू यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली त्यावेळी सिद्धू त्या समारंभाला हजर राहिले होते. तेव्हा पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांना सिद्धू यांनी आलिंगन दिले. त्यावरून अमरिंदरसिंग यांनी सिद्धूंवर टीका केली होती.