चंदीगड : पंजाबकाँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी शुक्रवारी पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची उपस्थिती होती. या दोघांमधील संघर्ष गेल्या काही दिवसापासून सुरू होता. यावेळी उपस्थितांनी चहा घेत नाराजीवर पडदा टाकल्याचे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सांगितले की, आम्ही राज्याच्या कल्याणासाठी एकत्र काम करू. पंजाब काँग्रेसचे नवे कार्यकारी अध्यक्ष संगत सिंह गिलजियां, सुखविंदर सिंह डॅनी, पवन गोयल आणि कुलजित सिंह नागरा यांनीही पक्ष मुख्यालयात कार्यकर्ते आणि समर्थकांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. यावेळी पंजाबचे प्रभारी हरीश रावत, माजी मुख्यमंत्री राजिंदर कौर भट्टल, ज्येष्ठ नेते प्रताप सिंह बाजवा आणि लाल सिंह आदी उपस्थित होते.
यावेळी सिद्धू म्हणाले की, पक्षाचा सामान्य कार्यकर्ता आणि प्रदेशाध्यक्ष यात काहीच फरक नाही. पंजाबमधील काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता आज पक्षाचा प्रदेशाध्यक्ष झाला आहे. क्रिकेटर ते नेते असा प्रवास केलेले सिद्धू यांनी सुनील जाखड यांची जागा घेतली आहे. पंजाब जीतेगा, पंजाबियों की जीत होगी, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. या कार्यक्रमापूर्वी सिद्धू आणि अमरिंदर सिंग हे एकमेकांच्या शेजारी बसल्याचे छायाचित्रही व्हायरल झाले आहे. या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते मनीष तिवारी यांचीही उपस्थिती होती.