Sidhu Moose Wala Murder: सिद्धू मूसेवाला हत्याकांडात मोठी कारवाई, उत्तराखंडमधून 6 संशयित ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 05:31 PM2022-05-30T17:31:42+5:302022-05-30T17:32:09+5:30
Sidhu Moose Wala Murder: पंजाबमधील प्रसिद्ध गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मूसेवाला यांची काल निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
डेहराडून: पंजाबचा प्रसिद्ध गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी उत्तराखंड आणि पंजाब एसटीएफने आज सकाळी हेमकुंडमधून 6 संशयितांना पकडले आङे. हे सर्वजण पंजाबची नंबरप्लेट असलेल्या पांढऱ्या एर्टिगा गाडीने परतत होते. पंजाब पोलिसांनी या 6 जणांची अनेक तास चौकशी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
या सर्व प्रकरणामध्ये एका शीख तरुणाचा सहभाग असल्याची माहिती आहे. पोलिसांना संशय आहे की, त्यानेच आरोपींना लॉजिस्टिक सपोर्ट दिला आणि त्यानंतर तो त्याच्या साथीदारांसह हेमकुंडला आला. ताब्यात घेण्यात आलेल्या या व्यक्तीचा गुन्हेगारी इतिहास आहे. विशेष म्हणजे, मूसेवाला हत्याकांडातील आरोपींना पकडण्यासाठी उत्तराखंड आणि पंजाब एसटीएफ संयुक्त कारवाई करत आहेत.
मुसेवालांच्या गाडीचा पाठलाग
रविवारी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर त्याचे वडील बलकौर सिंह यांनी सांगितले की, रविवारी त्यांचा मुलगा दोन मित्रांसह जीपमधून निघाला होता. त्याने आपले बुलेटप्रूफ वाहन घरी सोडले होते. यामुळे ते त्याच्या मागे गेले, यावेळी त्यांना दोन वाहने सिद्धूंचा पाठलाग करत असल्याचे दिसले. यावेळी अचानक दोन्ही वाहनांनी जीपला घेरले आणि अंदाधुंद गोळीबार केला आणि आरोपींनी पळ काढला.
गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोईवर आरोप
या हत्येमागे कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याचे बोलले जात आहे. या टोळीनेच मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. गँगस्टर गोल्डी ब्रारने फेसबुक पोस्ट टाकून हत्येची कबुली दिली आहे. ब्रार सध्या कॅनडात आहेत. हत्येनंतर पंजाबचे डीजीपी व्हीके भावरा यांनी ही माहिती दिली.