Sidhu Moosewala Murder: 'सिद्धू मूसेवाला आमचा भाऊ होता, दोन दिवसात निकाल लावू', नीरज बवाना गँगने दिली धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 03:08 PM2022-06-01T15:08:44+5:302022-06-01T15:08:55+5:30
Sidhu Moose Wala Murder Case: सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर बिश्नोई गँग आणि बवाना गँग आमने-सामने आले आहेत.
Sidhu Moose Wala Murder Case: प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या दिवसाढवळ्या झालेल्या हत्येने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटीपासून सर्वसामान्य नागरिक आणि राजकीय पक्षांनी या घटनेवर शोक व्यक्त केला. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्यावर हत्येचा आरोप आहे. यावरुन आता सोशल मीडियावर एक टोळीयुद्ध सुरू झाले आहे. कॅनडात लपून बसलेला गँगस्टर गोल्डी ब्रारने मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारल्यापासून, बंबिहा गट सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे आणि बदला घेण्यासाठी लॉरेन्स ग्रुपला सतत धमकावत आहे.
अनेक गँग एकवटल्या
फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये, नीरज बवाना टोळीने सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा निषेध केला आणि "दोन दिवसात निकाल लाऊ" असे म्हणत सूड घेण्याची धमकी दिली. बवाना नावाच्या हँडलने पोस्ट शेअर केली आहे. टिल्लू तेजपुरिया, कौशल गुडगाव आणि दविंदर बंबीहा टोळीचाही बवाना गँगशी संबंध आहे. एका पोस्टमध्ये गँगस्टर कुशल चौधरीने गायक मनकिरत औलख आणि गँगस्टर लॉरेन्स याच्या फोटोवर क्रॉसही टाकला आहे.
नीरज बवाना तिहार तुरुंगात
नीरज बवाना याला पोस्टमध्ये टॅग केले आहे. बवनावर खून व खंडणीचे अनेक गुन्हे असून, तो सध्या तिहार तुरुंगात आहे. नीरज बवानाचे अनेक साथीदार दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानमध्ये पसरलेले आहेत. ही फेसबुक पोस्ट नीरज बवाना टोळीचा सदस्य भूप्पी राणा नावाच्या हँडलने टाकली आहे. पोस्टमध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा सहकारी गोल्डी ब्रार याच्यावर टीका करण्यात आली होती.
बिष्णोई टोळीचा खोटा आरोप
लॉरेन्स बिश्नोई ग्रुपच्या नावाच्या अकाउंटवरुन मुसेवालाच्या हत्येनंतर पोस्ट केले की, ही हत्या अकाली दलाचे नेते विक्रमजीत सिंग (विकी मिड्डूखेडा) याच्या हत्येचा बदला आहे. गेल्या वर्षी मिद्दुखेडावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तेव्हा बंबीहा टोळीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. भूप्पी राणा हँडलच्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, बिश्नोई टोळीने मिद्दुखेडा आणि पंजाबमधील विद्यार्थी नेता गुरलाल बारा याच्या हत्येत मूसेवालाने मदत केल्याचा खोटा आरोप केला आहे. या हत्यांमध्ये सिद्धू मुसेवालाची कोणतीही भूमिका नव्हती. सिद्धू मुसेवाला आमचा भाऊ होता, त्याच्या हत्येत मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा हिशोब घेतला जाईल. त्याच्या मृत्यूचा लवकरच बदला घेतला जाईल, असे पोस्टमध्ये म्हटले आहे.