मानसा : पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) यांच्या हत्येनंतर विरोधकांनी भगवंत मान सरकारवर हल्लाबोल केला आहे. व्हीआयपी सुरक्षा हटवल्यानंतर लोकांची यादी, ज्या पद्धतीने सार्वजनिक झाली, त्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, सिद्धू मूसेवाला यांच्या आईनेही पंजाब सरकारला घेरले आहे.
पंजाबी गायिकेची आई चरणजीत कौर यांनी तिच्या मुलाच्या हत्येला भगवंत मान आणि अरविंद केजरीवाल जबाबदार असल्याचे म्हटले आहे. तसेच, स्वत:लाही गोळ्या घाला, असे चरणजीत कौर यांनी म्हटले आहे. दरम्यान, या हत्येप्रकरणी सिद्धू मूसेवाला यांच्या वडिलांनी मानसा येथे एफआयआर दाखल केला आहे. एफआयआरमध्ये म्हटले आहे की, सिद्धू मूसेवाला यांच्यासोबत बुलेटप्रूफ वाहन नव्हते किंवा पंजाब पोलिसांचे दोन्ही कमांडो त्यांच्यासोबत नव्हते.
"मान सरकार अपयशी सरकार आहे, ज्यामुळे सर्व काही संपुष्टात आले आहे. माझ्या मुलाच्या मृत्यूला पंजाबचे मुख्यमंत्री आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जबाबदार आहेत. आता मला सुद्धा गोळ्या घाला. राज्य सरकारने माझ्या मुलाची सुरक्षा काढून घेतली. तर भगवंत मान यांच्या बहिणीच्या सुरक्षेसाठी 29 सुरक्षा रक्षक आहेत", असे सिद्धू मूसेवाला यांची आई चरणजीत कौर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला यांची रविवारी भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पंजाबमधील भगवंत मान सरकारने शनिवारीच त्यांची सुरक्षा काढली होती. यापूर्वी त्यांच्याकडे दहा बंदूकधारी होते. पण, सध्या त्यांच्याकडे केवळ दोन गनमॅन होते. मूसेवाला यांचे मूळ नाव शुभदीपसिंग सिद्धू असे होते. मुसेवाला हे मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात आपल्या वाहनातून जात असताना हल्लेखोरांनी त्यांना गोळ्या घातल्या. हल्लेखोर एका काळ्या रंगाच्या वाहनातून आले होते. मूसेवाला यांचे दोन सहकारी यात जखमी झाले आहेत. मुसेवाला यांना गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सहभाग - डीजीपीपंजाबचे पोलीस महासंचालक (DGP) व्ही.के. भवरा यांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार, मूसेवाला यांची हत्या टोळ्यांमधील परस्पर वैमनस्यातून झाली आहे. या हत्येत लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सहभाग असल्याचेही त्यांनी सांगितले. घटनेच्या तीन तासांनंतर गँगस्टर गोल्डी ब्रारने फेसबुक पोस्टद्वारे हत्येची जबाबदारी स्वीकारली. गोल्डी ब्रार हा सध्या कॅनडामध्ये आहे. मूसेवाला यांच्या हत्येच्या तपासासाठी विशेष तपास पथक(SIT) स्थापन करण्यात येणार आहे.