- बलवंत तक्षक नवी दिल्ली : काँग्रेसचे स्टार प्रचारक नवज्योत सिंह सिद्धू हरयाणाच्या निवडणूक मैदानात पुन्हा एकदा चौकार- षटकार मारण्यासाठी तयार आहेत. काँग्रेस निवडणूक प्रचार समितीकडून पक्षाला पाठविण्यात आलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत सर्वात पहिले नाव सिद्धू यांचे आहे.सिद्धू यांनी लोकसभा निवडणुकीत हरयाणात काँग्रेस उमेदवारांचा प्रचार केला होता. त्यांची भाषणे ऐकण्यासाठी तेव्हा मोठी गर्दी होत होती. पण, राज्यातील सर्व दहा जागा भाजपच्या खात्यात गेल्या.लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पंजाबमध्ये प्रचाराच्या काळात सिद्धू यांचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासोबत जमले नाही. दोन नेत्यातील तणाव वाढला होता. अखेर सिद्धू यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.हरयाणात सत्तारुढ भाजपविरुद्ध सिद्धू पंजाबी आणि शीख बहुल मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांसाठी प्रचार करतील. हरयाणात जवळपास ३० जागा अशा आहेत जिथे पंजाबी आणि शीख मतदारांची मोठी संख्या आहे.कोणत्याच आमदाराला पुन्हा संधी नाहीहरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील बरवाला हा एक असा मतदारसंघ आहे, ज्याने आजवर कोणत्याच आमदाराला दुसऱ्यांदा विधानसभेत पाठवलेले नाही. मागील ५२ वर्षांत १२ निवडणुका झाल्या. आजवरच्या निवडणुकीचे निकाल पाहता येथील मतदारांचे आपल्या आमदाराच्या कामाबाबत कधीच समाधान झालेले दिसत नाही. पाच वर्षांपूर्वी २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत इंडियन नॅशनल लोकदलाचे (इनॅलो) वेद नारंग विजयी झाले होते. त्यापूर्वी २००९ मध्ये काँग्रेसचे रामनिवास घोडेला आमदार झाले होते. २००५ मध्ये काँग्रेसचे रणधीर सिंह ऊर्फ धीरा विधानसभेत गेले होते. अशा प्रकारे येथील मतदारांनी प्रत्येक वेळी आमदार बदललेला दिसतो.मुलीच्या उमेदवारीसाठी मंत्रीपदावर पाणी?चंदीगड : आपली मुलगी आरती राव हिला हरियाणाच्या रेवाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी केंद्रीय सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी राज्यमंत्री राव इंद्रजितसिंग यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. भाजपने आरती राव यांना उमेदवारी नाकारली आहे.अनेक भाजप नेत्यांच्या कुटुंबांतील अनेक सदस्य सत्तापदावर असल्याचे दाखवून देऊन हा फॉर्म्युला आपल्यालाच का लावला जात आहे, असा प्रश्न राव यांनी उपस्थित केला आहे. राज्यसभा सदस्य चौधरी बिरेंद्रसिंग यांचे छोटे पुत्र बृजेंद्रसिंग खासदार आहेत, तसेच त्यांची पत्नी प्रेमलता उचानाकला मतदारसंघाच्या आमदार आहेत. प्रेमलता यांना भाजप पुन्हा उमेदवारी देणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री कृष्णपाल गुज्जर यांचे पुत्र देवेंद्र चौधरी फरिदाबादचे उपमहापौर आहेत.
निवडणुकीच्या मैदानात चौकार, षटकार मारण्यासाठी सिद्धू तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 4:32 AM