नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू आणि भारतीय जनता पार्टीतून नुकतेच बाहेर पडलेले राज्यसभा सदस्य नवज्योतसिंग सिद्धू यांनी आम आदमी पार्टीत प्रवेशासाठी कोणत्याही अटी घातल्या नसून त्यांना विचार करण्यासाठी थोडा वेळ हवा आहे, असे सांगून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिद्धू यांच्या संभाव्य आप प्रवेशाबाबतच्या अफवांना शुक्रवारी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपमध्ये प्रवेश केला किंवा नाही केला तरी त्यांच्याविषयीचा आपला आदर कमी होणार नाही, असे केजरीवाल म्हणाले. सिद्धू यांनी गेल्या शुक्रवारी केजरीवाल यांची येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. तत्पूर्वी केजरीवाल यांनी सिद्धू हे आपचा पंजाबमधील चेहरा बनणार असल्याच्या चर्चा घाईच्या असल्याचे म्हटले होते. नवज्योतसिंग सिद्धू आपमध्ये प्रवेश करतील की नाही, यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यामुळे आमची बाजू मांडणे हे माझे कर्तव्य आहे, असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी स्पष्ट केले. या क्रिकेटपटूविषयी मला नितांत आदर आहे. सिद्धू यांनी गेल्या आठवड्यात माझी भेट घेतली. आम आदमी पक्षातील प्रवेशासाठी त्यांनी कोणत्याही पूर्वअटी टाकल्या नाहीत. मात्र विचार करण्यासाठी त्यांना वेळ हवा आहे. त्यांच्या या भूमिकेचा आपण आदर करू. ते महान क्रिकेटपटू आणि चांगले व्यक्ती आहेत. त्यांनी आपमध्ये प्रवेश केला किंवा नाही केला तरी त्यांच्याबद्दलचा माझा आदर कायम राहील, असे केजरीवाल यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांनी गेल्या महिन्यात राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपवर जोरदार टीका केली होती, तेव्हापासूनच ते आपमध्ये प्रवेश करणार असल्याची कुजबूज सुरू आहे. केजरीवाल यांनी आज केलेले टिष्ट्वट्स याच्या विसंगत आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सिद्धू यांंना थोडा वेळ हवा आहे - केजरीवाल
By admin | Published: August 20, 2016 1:29 AM