पंजाबमध्ये पक्षाने प्रचारात सहभागी करून न घेतल्याने सिद्धू नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 05:58 AM2019-05-08T05:58:08+5:302019-05-08T05:58:43+5:30
देशात विविध ठिकाणी काँग्रेसच्या प्रचारसभांमध्ये रंग भरणारे पंजाबचे मंत्री व माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांना दस्तुरखुद्द पंजाबमध्ये प्रचार करण्यास आडकाठी करण्यात आली आहे. त्यामुळे ते प्रचंड नाराज आहेत.
- बलवंत तक्षक
चंदिगढ : देशात विविध ठिकाणी काँग्रेसच्या प्रचारसभांमध्ये रंग भरणारे पंजाबचे मंत्री व माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांना दस्तुरखुद्द पंजाबमध्ये प्रचार करण्यास आडकाठी करण्यात आली आहे. त्यामुळे ते प्रचंड नाराज आहेत.
निवडणुकांसाठी राज्यात प्रचार करण्यापासून रोखल्याच्या दुसऱ्याच दिवशी सिद्धू पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यावर बरसले. एका मुलाखतीत सिद्धू म्हणाले की, मला पंजाबमध्ये प्रचार करू द्यायचा नाही, असे नेतृत्वाने ठरविले आहे. पंजाबमधील लोकसभेच्या १३ जागा जिंकण्याच्या लढाईत काँग्रेस कमी पडल्यास त्यास मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंह जबाबदार असतील. विजयाचे श्रेय जसे त्यांना मिळेल, तसे पराभवाची जबाबदारीही त्यांना स्वीकारावी लागेल.
कॅप्टन अमरिंदरसिंग व नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात अनेक मतभेद आहेत. सिद्धू पाकच्या दौºयावर गेले होते. तिथे त्यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांना आलिंगन दिल्याबद्दल अमरिंदरसिंग यांनी कडक टीका केली होती.
राहुल हेच माझे नेते
सिद्धू म्हणाले की, माझे नेते कॅ. अमरिंदरसिंग नसून राहुल गांधी आहेत. यानंतर ते मंत्रिमंडळात एकाकी पडले. काही मंत्र्यांनी सिद्धू यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. सरतेशेवटी ज्येष्ठांनी मध्यस्थी करून दोघांमध्ये समझोता घडवून आणला. मात्र आता पंजाबमध्येच प्रचार करू दिला जात नसल्याने ते संतापले आहेत.