चंदीगड : ‘आवाज- ए- पंजाब’ या बिगर राजकीय आघाडीची घोषणा करताना नवज्योत सिंग सिद्धू यांनी अकाली दल, भाजप, आप आणि काँग्रेसवर हल्ला केला. जुलैत राज्यसभेचा राजीनामा देणारे सिद्धू यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले की, ‘आवाज-ए-पंजाब’ सध्या तरी राजकीय पक्ष नसून आघाडी आहे आणि या आघाडीच्या भवितव्याबाबत १५ दिवसांत निर्णय होईल. विकास करून पंजाबला समृद्ध करणे आणि पंजाबमधील बादल यांची घराणेशाही संपुष्टात आणून लोकांच्या हाती सत्ता देणे, हा आमचा उद्देश आहे.बादल परिवारावर कडाडून हल्ला करताना सिद्धू म्हणाले की, काळेकुट्ट ढग (बादल) दूर होऊन जनेतला सूर्योदय बघायचा आहे. लोकनियुक्त सरकार एकाच परिवाराचे नसते. बादल परिवाराने पंजाब आणि अकाली दलाला आपल्या परिवाराची मालमत्ता बनवली. अकाली आणि काँग्रेस म्हणजे एकाच्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. मैत्रीपूर्ण लढतीत या दोन पक्षांनी पंजाबची वाट लावली. सिद्धू यांच्यासमवेत पत्रकार परिषदेत परगट सिंह, सिमरजित आणि बलविंदर बैन उपस्थित होते.आपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेबाबत ते म्हणाले, केजरीवाल आपमध्ये या, म्हणून मागे लागले होते. निवडणूक लढवू नका, तुमच्या पत्नीला मंत्री करू, असे आमिष त्यांनी दाखवले होते. (वृत्तसंस्था)
सिद्धूची फटकेबाजी; केजरीवाल, बादलांवर हल्ला
By admin | Published: September 09, 2016 4:32 AM