चंदिगढ: इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी गेलेले पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी तेथे पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना प्रेमभराने आलिंगन दिल्यावरून पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरेंद्र सिंग नाराजी व्यक्त केली. तर स्वत: सिद्धू यांनी गळाभेटीचे समर्थन केले.अमरेंद्र सिंग म्हणाले की, पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची सिद्धू यांनी गळाभेट घेणे मला आवडलेले नाही. सिद्धू यांना एवढे प्रमोचे भरते येणे चुकीचे आहे, असे मला वाटते.अट्टारी-वाघा सिमेवरून रविवारी भारतात परतल्यावर सिद्धू यांनी इम्रान खान यांच्या शपथविधीच्या वेळी त्यांच्यावर टीका झालेल्या दोन्ही मुद्द्यांवर स्वत:च्या कृतीचे समर्थन केले. जनरल बाजवा यांना दिलेल्या आलिंगनाविषयी ते म्हणाले, पाकिस्तानचे लष्करप्रमुख स्वत:हून माझ्यापाशी आले व आपण दोघे एकाच संस्कृतीचे आहोत असे म्हणत त्यांनी आपुलकी व्यक्त केली. शिवाय गुरु नानकदेव यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त करतारपूर सीमाचौकी खुली करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत मी दुसरे काय करणे अपेक्षित होते?सिद्धू यांना विदेशी निमंत्रितांमध्ये न बसविता पाकमधील मान्यवरांसोबत बसविले गेले. पाकव्याप्त काश्मीरचे अध्यक्ष मसूद खान त्यांच्या शेजारी बसलेले होते. याविषयी सिद्धू यांचे म्हणणे असे की, एखाद्या ठिकाणी सन्मान्य पाहुणे म्हणून बोलाविले जाते तेव्हा यजमान सांगतील तेथे तुम्हाला बसावे लागते. मी आधी दुसरीकडे बसलो होते. तेथून उठवून त्यांनी मला या ठिकाणी बसायला सांगितले.
सिद्धूंच्या गळाभेटीवर नाराजी; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे खडे बोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:15 AM