मुंबई - अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भव्य-दिव्यतेने पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते रामललाची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यानंतर, देशभरात जय श्रीरामाचा नारा देत रामभक्तांचा आनंदोत्सव पाहायला मिळाला. तर, दुसऱ्याच दिवशी लाखो भाविकांची दर्शनासाठी मंदिराबाहेर गर्दी उसळल्याचं दिसून आलं. आत्तापर्यंत ३ लाख भाविकांनी अयोध्येतील रामललाचे दर्शन घेतले आहे. त्यानंतर, आता पुढील काही महिने मोठ्या प्रमाणात भाविक अयोध्येत येणार आहेत. त्यासाठी, विमानसेवा आणि रेल्वेनेही भक्तांसाठी खास पॅकेज जाहीर केलं आहे.
पर्यटनाला चालना देण्यासाठी रेल्वेकडून सातत्याने नवनवीन पॅकेज आणि रेल्वेसेवा पुरविण्यात येतात. तर, धार्मिक दर्शनासाठीही रेल्वेच्या विशेष गाड्या धावत असतात. आता, आयआरटीसीने अयोध्या दर्शनयात्रेसह नाशिक, वाराणसीसह अनेक धार्मिक स्थळांच्या दर्शनाची सोय केली आहे.
९ रात्री आणि १० दिवसांच्या यात्रेसाठीच्या या पॅकेजची सुरुवात गुजरातच्या राजकोट येथून होणार आहे. प्रवाशांना भारत गौरव स्पेशल टुरिस्ट ट्रेनद्वारे हा प्रवास करता येईल. त्यामध्ये राहण्याची व जेवणाची सुविधाही रेल्वेच्यावतीने केली जाणार आहे. या पॅकेजअंतर्गत प्रवाशांना प्रयागराज, शृंगवेपूर, चित्रकूट, वाराणसी, उज्जैन आणि नाशिक येथील धार्मिक पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. ५ फेब्रुवारीपासून ह्या पॅकेजची सुरूवात होत आहे. प्रवाशांना राजकोट येथून बोर्डींग करता येणार आहे. राजकोट, सुरेंद्र नगर, विरमगाम, साबरमती, नडियाद, आनंद, छायापुरी, गोधरा, दाहोद, मेघनगर, रतलाम येथून ट्रेनने बोर्डींग करता येईल. रात्रीच्या प्रवासानंतर ट्रेन ६ फेब्रुवारी रोजी सकाळी अयोध्येला पोहचणार आहे.
६ ते १४ फेब्रुवारीपर्यंत १० दिवसांची ही यात्रा असून यात राम मंदिर दर्शन, प्रयागराज, रामघाट, चित्रकूट, मंदाकिनी स्नान, वाराणसी, काशी विश्वनाथ दर्शन, गंगा आरती, उज्जैन, महाकालेश्वल ज्योतिर्लिंग, कालभैरव, हरिसिद्ध माता मंदिर येथून नाशिककडे रवाना होता येईल. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी नाशिक येथे पोहोचल्यानंतर पंचवटी, काळाराम मंदिर, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन करुन नाशिकहून ही ट्रेन पुन्हा राजकोटकडे मार्गस्थ होईल.
१० दिवसांच्या या अयोध्या धार्मिक पर्यटनासाठी प्रवाशांना स्लीपर कोचसाठी प्रतिव्यक्ती २०,५०० रुपये बुकींग असणार आहे. तर, थर्ट एसीसाठी ३३,००० रुपये खर्च होणार आहे. तसेच, सेकंड एसीसाठी प्रवाशांना ४६,००० रुपये द्यावे लागणार आहेत.
आयआरटीसीच्या अधिकारीक वेबसाईटवर जाऊन प्रवाशांना हे बुकींग करता येईल. तर, अधिक माहितीसाठी 9321901849, 9321901851, 9321901852, 8287931724, 8287931627, 8287931728 या नंबरवर संपर्क करावा लागेल.
स्पाईसजेटची सेवा काय?
स्पाईसजेट १ फेब्रुवारी २०२४ पासून अयोध्येला इतर अनेक शहरांशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. चेन्नई, अहमदाबाद, दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, जयपूर, पाटणा आणि दरभंगा येथून अयोध्येसाठी उड्डाणं सुरू केली जातील.
काय आहे अधिक माहिती?
बुकिंग पिरिअड - २२ ते २८ जानेवारी २०२४ट्रॅव्हल पिरिअड - २२ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०२४