ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून दहशतवादी तळांवर कारवाई केल्यानंतर उरी हल्ल्याचा बदला पूर्ण झाल्याची अनेकांची भावना आहे. मात्र त्याचवेळी केंद्र सरकारने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना भारतीय लष्कराकडून करण्यात आलेल्या या कारवाईची माहिती दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही तातडीने दिल्लीला बोलवून घेण्यात आले आहे. ते माजी संरक्षणमंत्री होते. दुपारी चारवाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. तिन्ही सैन्य दलांनाही सर्तक रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मर्यादीत स्वरुपाच्या लष्करी कारवाईनंतर इतक्या वेगाने घडामोडी का सुरु आहेत ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भारतीय लष्कराचे डीजीएमओनी पत्रकारपरिषद घेऊन या सर्जिकल स्ट्राईक्सची माहिती देत असतानाच शेअर बाजार कोसळण्यास सुरुवात झाली. जवळपास ४०० अंकांनी शेअर बाजार कोसळला. या सर्व घडामोडींमुळे भारताकडून संभाव्य युध्दाची तयारी तर सुरु नाही ना ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.