सुरेश भुसारीनवी दिल्ली : देशातील हवाई प्रवास सुरक्षित करण्यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची (सीआयएसएफ) भूमिका महत्त्वपूर्ण असून, कंदहारच्या घटनेनंतर विमान वाहतूक सुरक्षा तोडण्यास दहशतवाद्यांना यश आले नाही. परंतु यासोबत सामान्य प्रवाशांना हवाई प्रवास करताना अडचण येणार नाही, याची काळजी घेतली जात असल्याची माहिती दिल्ली येथील सीआयएसएफचे अतिरिक्त महासंचालक (विमान वाहतूक सुरक्षा) प्रमोद फळणीकर यांनी दिली.
सीआयएसएफचे अतिरिक्त महासंचालक प्रमोद फळणीकर यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये सीआयएसएफची स्थापना, तिचे आंतरिक सुरक्षेमधील स्थान, दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी जवानांकडे अत्याधुनिक यंत्रसामुग्रीची उपलब्धता व विमानतळांवर प्रवासीस्नेही सुरक्षा पुरविण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांबद्दल माहिती दिली. मध्यप्रदेश केडरचे १९८९च्या तुकडीचे आयपीएस असलेले फळणीकर मूळ पुण्यातील आहेत.
या संस्थेने गेल्या ५० वर्षांमध्ये सुरक्षेच्या क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण केले असून, आज विमानतळ, बंदरे, पीएसयू त्याचप्रमाणे व्हीआयपींची सुरक्षा करण्यात सीआयएसएफची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. डिसेंबर १९९९मध्ये पाकच्या दहशतवाद्यांनी भारतीय विमान कंदहारला हायजॅक केले होते. या घटनेपर्यंत विमानतळांवरील सुरक्षा संबंधित राज्यांच्या पोलिसांकडे होती, असे सांगून फळणीकर म्हणाले, यानंतर सरकारने विमानतळांवरील सुरक्षा भक्कम करण्याचा निर्णय घेतला. आज देशातील ६५ विमानतळांची सुरक्षा या संस्थेकडे आहे. कंदहार घटनेनंतर देशातील विमानतळांवर हायजॅकची एकही घटना घडली नाही. विमानतळांच्या सुरक्षेत लक्षणीय बदल झाल्याचा उल्लेख फळणीकर यांनी आवर्जुन केला.
सुरक्षेच्या मानकांमध्ये आता खूप बदल झाल्याचे सांगून फळणीकर म्हणाले, दहशतवादीसुद्धा अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करतात. त्यामुळे या तत्त्वाचा सामना करण्यासाठी सीआयएसएफसुद्धा वारंवार जवानांना प्रशिक्षित करून त्यांना अत्याधुनिक साधने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे दिल्ली विमानतळाचा सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून जगातील अव्वल विमानतळांमध्ये समावेश होतो. विमानतळाची सुरक्षा करताना सामान्य प्रवाशांना त्रास होणार नाही, याची काळजीसुद्धा सीआयएसएफ घेत असल्याचे सांगून ते म्हणाले, आता विमानप्रवास मोठ्या प्रमाणावर केला जात आहे, असे ते म्हणाले.