ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27- 'अतिथी देवो भव' हे भारतीय पर्यटन मंत्रालयाचं ब्रिद वाक्य. भारतात येणा-या विदेशी पर्यटकांची वाढती संख्या पाहता हे वाक्य सार्थ ठरताना दिसत आहे. आजचा दिवस जगभरात जागतिक पर्यटन दिवस म्हणून साजरा होत आहे, त्यानिमित्त समोर आलेली आकडेवारी भारतासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे.1980 पासून संयुक्त राष्ट्र संघाची जागतिक पर्यटन शाखा 27 सप्टेंबरला हा दिन साजरा करीत आली आहे. 1970 साली स्थापन झालेल्या शाखेने जागतिक पर्यटनाचे आराखडे तयार करून, तुर्की येथील इस्तांबूलमध्ये 1997 साली भरलेल्या 12 व्या अधिवेशनात ‘पर्यटन दिवस’ साजरा करण्याचा ठराव केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौ-यात विदेशी नागरिकांना इलेक्ट्रोनिक यात्रा स्वीकृती (ईटीए) आणि आगमनावर प्रवासी व्हिसा (टीवीओए)ची घोषणा केली होती. याचा फायदा 150 देशातील पर्यटकांना होत असून भारतात येणं त्यांच्यासाठी अधिक सोयीस्कर झालं आहे.
केंद्र सरकारने या योजनेची सुरुवात 27 नोव्हेंबर 2014 रोजी केली होती. पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ही योजना सुरू झाल्यानंतर भारतात विदेशी पर्यटकांच्या संख्येत लक्षणिय वाढ झाली आहे.
2015 मध्ये ई-व्हिसावर 1 लाख 10 हजार 657 पर्यटक भारतात आले होते, तर मे 2016 पर्यंतच्या आकडेवारीनुसार 4 लाख 34 हजार 927 पर्यटक भारतात आले. तसेच 2014 च्या तुलनेत भारतात येणा-या विदेशी पर्यटकांमध्ये 13.48 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2014 मध्ये जवळपास 32.04 टक्के विदेशी पर्यटक भारतात आले होते. तर 2016 च्या पहिल्या 5 महिन्यात 36.36 लाख विदेशी पर्यटक भारतात आले.
यामध्ये हिवाळ्यात भारतात येणा-या पर्यटकांची संख्या जास्त आहे तर उन्हाळ्यामध्ये मात्र पर्यटकांची संख्या तुलनेने कमी होते.
भारतात येणा-या विदेशी पर्यटकांची पहिली पसंती ही राजधानी दिल्लीला आहे .त्यानंतर अनुक्रमे आर्थिक राजधानी मुंबईचा आणि चेन्नईचा नंबर लागतो.