चेन्नई : तामिळनाडूच्या सत्ताधारी अण्णाद्रमुकच्या मंत्र्यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. मंत्रिमंडळातील मंत्री, त्यांच्या पत्नी आणि कुटुंबातील अन्य व्यक्तींच्या नावाने असणाऱ्या एकूण संपत्तीत १११ टक्क्यांची वाढ झाली आहे. या मंत्र्यांनी २०१६ मध्ये जाहीर केलेल्या १५४.६९ कोटींची संपत्ती २०२१ पर्यंत ३२६ कोटींपर्यंत पोहोचली आहे. निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून हे समोर आले आहे.
२०१६ च्या निवडणुकीत सादर केलेल्या माहितीनुसार या मंत्र्यांची चल संपत्ती ५५ कोटी रुपये होती. ती आता १६२ कोटी झाली असून, त्यात १९७.२ टक्क्यांची भर पडली आहे. स्थावर संपत्ती १०० कोटींची होती, त्याचे मूल्य आता १६४ कोटींचे झाले आहे. मंत्र्यांची सरासरी चल संपत्ती १.९२ कोटी तर सरासरी संपत्ती १२.०९ कोटी इतकी आहे. सर्वाधिक संपत्ती असलेल्या आघाडीच्या पाच मंत्र्यांमध्ये के. सी. विरामणी (६८.७ कोटी), सी. विजयाभास्कर (६१.५ कोटी), पी. बेंजामिन (२५.६ कोटी), के. पी. अनबलगन (१८.८ कोटी), के. सी. कृप्पान्नन (१८.२ कोटी) यांचा समावेश होतो.
सर्वाधिक वेगाने संपत्ती वाढलेल्यांमध्ये माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम (४०९ टक्क्यांनी ७.८२ कोटी), एस. रामचंद्रन (५८१ टक्क्यांनी १४.९ कोटी), के. राजू (४४५ टक्क्यांनी ६.५ कोटी), व्ही. एम. राजलक्ष्मी (३५९ टक्क्यांनी २.६६ कोटी) यांचा समावेश आहे.
कोटीच्या कोटी उड्डाणे...
उच्च शिक्षणमंत्री के. पी. अनबलगन यांनी आपल्या संपत्तीत सर्वाधिक वाढ दाखवली आहे. त्यांची मालमत्ता २.४ कोटींवरून १९.२७ कोटी इतकी झाली आहे, तर मुख्यमंत्री ई. के. पलानीस्वामी आणि सांस्कृतिक व तामिळ भाषा मंत्री के. पंडीराजन यांच्या मालमत्तेत घट झाल्याचे त्यांनी दिलेल्या माहितीवरून दिसते. मुख्यमंत्री पलानीस्वामी यांची संपत्ती ७.८ कोटींवरून ६.७ कोटी इतकी झाली आहे.