नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या नव्या, तसेच आधीपासून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. सलग चौथ्या दिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या ६० हजारांहून कमी होती. रुग्णांची एकूण संख्या ७७ लाखांवर, तर बरे झालेल्यांची संख्या ६८ लाखांवर पोहोचली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या गेल्या चोवीस तासांत २४,२७८ इतकी कमी झाली. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या ७,१५,८१२ झाली असून तिचे प्रमाण ९.२९ टक्के आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण ८९.२० टक्के आहे. या संसर्गाच्या रुग्णांचा मृत्यूदर १.५१ टक्के इतका कमी राखण्यात भारताला यश आले आहे. गेल्या सहा दिवसांत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ८ लाखांपेक्षा कमी आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार देशभरात कोरोना चाचण्यांची संख्या ९,८६,७०,३६३ झाली आहे.
अमेरिकेत ८५ लाखांहून अधिक रुग्ण अमेरिकेत ८५ लाख ८४ हजारांहून अधिक रुग्ण आहेत. दुसऱ्या स्थानावरील भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या अमेरिकेपेक्षा ५ लाख ७७ हजारांहून कमी आहे. तिसऱ्या स्थानी असलेल्या ब्राझीलमध्ये ५३ लाख कोरोना रुग्ण आहेत.
या संसर्गामुळे गुरुवारी 702 जण मरण पावले असून बळींचा एकूण आकडा 1,16,616 वर पोहोचला आहे. तर, 55,839 नवे रुग्ण आढळून आल्याने एकूण संख्या 77,06,946 झाली असून 68,74,518 रुग्ण बरे झाले आहेत.