महाराष्ट्र काँग्रेसमध्ये बदलाचे संकेत; दिल्ली दरबारी हाचलाची सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 09:05 AM2023-02-17T09:05:11+5:302023-02-17T09:06:22+5:30
पटोले व थोरात यांच्यातील तणावानंतर थोरात यांनी विधिमंडळ पक्षाच्या नेते पदाचा राजीनामा दिला होता
आदेश रावल
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राजधानीतून मिळत असलेल्या संकेतांनुसार महाराष्ट्र काँग्रेसमध्ये बदल होऊ शकतो. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केरळचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांना महाराष्ट्र काँग्रेसच्या संकटावर अहवाल देण्यास सांगितले आहे. दिल्ली श्रेष्ठींनी बाळासाहेब थोरात यांना सांगितले आहे की, आपल्याला विधिमंडळ पक्षनेते पदावर राहायचे नाही, ही बाब तुम्ही आमच्यावर सोडा.
पटोले व थोरात यांच्यातील तणावानंतर थोरात यांनी विधिमंडळ पक्षाच्या नेते पदाचा राजीनामा दिला होता व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमवेत काम करू शकत नाही, असे म्हटले होते. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात यांनी एका मंचावरून पत्रपरिषद घेतली तेव्हा अनेकांना वाटले की, असे काय झाले आहे की, दोघे एका मंचावर येण्यास राजी झाले?
दिल्ली श्रेष्ठींनी महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांना संदेश देऊन थोरात यांच्याकडे पाठवले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एच. के. पाटील यांनी थोरात यांना दिल्ली श्रेष्ठींचा संदेश पोहोचवला आणि सांगितले की, रायपूरमध्ये होणारे अधिवेशन व महाराष्ट्रातील पोटनिवडणुकांपर्यंत आपण सहकार्य करावे. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्राबाबत फैसला करणार आहेत.