नवी दिल्ली: कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटनं सगळ्यांचीच चिंता वाढली आहे. आतापर्यंत ५० हून अधिक देशांमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. देशातील ६ राज्यं आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना लसीचा प्रभाव करण्याची क्षमता ओमायक्रॉनमध्ये आहे. त्यामुळे आता बूस्टर डोसची गरज निर्माण झाली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
सीरमनं बूस्टर डोसबद्दलचा तपशील विषय तज्ज्ञांच्या समितीसमोर (एसईसी) सादर केला. मात्र एसईसी युकेच्या मेडिसन एँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीनं बूस्टर डोसला परवानगी देण्याबद्दल सहमती दर्शवलेली नाही. इंडिया टुडेनं याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
विषय तज्ज्ञांच्या समितीनं सीरमला बूस्टर डोसची निर्मिती करण्याची परवानगी दिलेली नाही. यासंदर्भात समितीची बैठक १० डिसेंबरला झाली. सीरमनं बूस्टर डोसबद्दलचा तपशील समितीसमोर सादर केला होता. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर ६ महिन्यांनी बूस्टर डोस देण्यात येणार असल्याची माहिती सीरमकडून समितीला देण्यात आली. ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेकानं ब्रिटनमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील ट्रायल घेतल्या आहेत.
सीरमनं ब्रिटनमधील संशोधनाच्या तपशीलापैकी ७५ टक्केच माहिती जमा केल्याचं विषय तज्ज्ञांच्या समितीला तपासातून आढळून आलं. याशिवाय सीरमनं भारतीय नागरिकांशी संबंधित बूस्टर डोसचा तपशीलदेखील शेअर केलेला नाही. बूस्टर डोसबद्दलचा स्थानिक क्लिनिकल ट्रायलचा तपशीलदेखील सीरमनं दिला नसल्याचं समितीनं म्हटलं.