नवी दिल्ली- शीख मुलाला अमेरिकेत मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अहवाल मागविला आहे. अमेरिकेतील भारतीय दुतावासाला याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश सुषमा स्वराज यांनी दिले आहेत. शीख मुलाला अमेरिकेत मारहाण झाल्याची घटना घडल्याचं मी बातम्यांमध्ये पाहिलं आहे. या घटनेबद्दल अमेरिकेतील भारतीय दुतावासाला अहवाल सादर करायला सांगितलं आहे, असं ट्विट शनिवारी सुषमा स्वराज यांनी केलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, केंट्रिझ हाय स्कूलमधील एका 14 वर्षीय मुलाला त्याच्या वर्गातील काही मुलांनी मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ तयार करून तो स्नॅपचॅटवर शेअर करण्यात आला. शीख मुलाचा त्याच्या वर्गातील मुलांनी पाठलाग केला. नंतर त्याला अचानक त्या मुलांनी मारायला सुरूवात केली. त्या मुलांनी पीडित मुलाला मारहाण करण्याच सुरूच ठेवलं होतं. तो मुलगा सतत स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करत होता. हा संपूर्ण प्रकार व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसतो आहे.
मुलगा भारतीय वंशाचा आणि शीख असल्याने त्याच्यावर हल्ला झाल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे. पण मुलावरील हल्ला हा धार्मिक मुद्द्यावरून झाल्याचा आरोप शाळेने फेटाळला आहे. मुलाला ज्याने मारहाण केली तसंच ज्याने त्या मारहाणीचा व्हिडीओ तयार केला, त्यांना कडक शिक्षा केली असल्याचं, केन्ट स्कूलचे कम्युनिकेशन डायरेक्टर क्रिस लोफ्टिस यांनी म्हंटलं.
सहा महिन्यांपूर्वी केन्टमध्ये एका शीख नागरिकाची गोळी झाडून हत्या केली होती. तुमच्या देशात निघून जा, असं ओरडत हल्लेखोराने त्या नागरिकाची हत्या केली. सहा महिन्यानंतर पुन्हा मारहाणीची घटना घडली आहे.