मेलबर्न - कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. त्यापासून ऑस्ट्रेलियाही सुटलेला नाही. येथेही मोठ्या प्रमाणावर कोरोनाग्रस्त आढळून येत आहेत. मात्र, असे कोरोनाचे संकट असतानाही शिख बांधवांनी येथील जनतेची मनं जिंकली आहेत. हे शीख बांधव येथील गरजूंना मोफत भोजन देत आहेत.
जे लोक सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत अथवा ज्यांना पैशाची चंचण भासत आहे, अशा ऑस्ट्रेलियन नागरिकांना हे शिख बांधव सढळ हाताने मदत करत आहेत. आतापर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये 5,500 हून अधिक कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत.
रोज 800हून अधिक लोकांना देतात भोजन
ऑस्ट्रेलियन सरकारने कोरोनापासून बचावासाठी जनतेला घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. यामुळे एकटेच राहणारे अथवा गरीब लोकांच्या खाण्या-पिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यापार्श्वभूमीवर व्हिक्टोरिया राज्यातील शीख व्हॉलंटियर्स ऑस्ट्रेलियाने (एसव्हीए) आपल्या सदस्य परिवारांना आवाहन केले, की त्यांनी येथील गरजूंना मोफत भोजन आणि इतर आवश्यक साहित्य पुरवावे.
यानंतर आता एसव्हीएचे लोक डिलिव्हरी व्हॅनच्या सहाय्याने रोज 800 हून अधिक ऑस्ट्रेलियन नागरिकांना भोजन पोहोचवत आहेत. यात सूप, पास्ता, भात आणि भाजीचा समावेश आहे. या संघटनेचे एक सदस्य मनप्रीत सिंग यांनी सांगितले, की गरजू लोकांना मोफत भोजन पुरवण्याची ही मोहीम, तीन वर्षांपूर्वी मेलबर्न येथून सुरू झाली. जी हळू-हळू इतर शहरांपर्यंतही पोहोचली आहे.
कोरोनापासून बचावासाठीही पूर्ण व्यवस्था -
भेजन तयार करणे आणि वितरित करतानाही एसव्हीए कोरोना व्हायरसपासून बचावासाठीही पूर्णपणे खबरदारी घेते. ऑस्ट्रेलियातील शीख संप्रदायाच्या यूनायटेड शीख्स नावाच्या आणखी एका संघटनेनेही अशाच प्रकारची मोहीम सुरू केली आहे. तेदेखील शंभर गरजूंना रोज भोजन देतात.