चंदीगड : आम आदमी पार्टीने (AAP) पंजाब विधानसभेत 117 पैकी 92 जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवले आहे. 'आप'च्या विजयानंतर बंदी घालण्यात आलेली संघटना शीख फॉर जस्टिसने (SFJ) आरोप केला आहे की, खलिस्तान समर्थकांच्या (Khalistan Supporters) मदतीने 'आप'ने पंजाब निवडणुकीत विजय मिळवला आहे. यासंदर्भात शिख फॉर जस्टिसने 'आप'चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान (Bhagwant Mann) यांना पत्र लिहिले आहे.
भगवंत मान यांना लिहिलेल्या पत्रात 'आप'ने प्रचाराशिवाय आणि कॅडरशिवाय 70 टक्के जागा जिंकल्याचे म्हटले आहे. 'आप'ला खलिस्तानी समर्थकांकडून निधी मिळाला आणि खलिस्तानी समर्थकांचा मोठा पाठिंबा मिळाला. 'आप'ने शिख फॉर जस्टिसच्या बनावट पत्रांद्वारे मते मिळविली आणि पार्टीने खलिस्तान समर्थक शीखांच्या मतांचे फसवे समर्थन केल्याचे म्हटले आहे. तसेच, शीख फॉर जस्टिसने आपल्या पत्रात आरोप केला आहे की, खलिस्तानी फंडिंगमुळे 'आप'ने प्रचार केला नसतानाही त्यांना मते मिळाली.
दरम्यान, पंजाब विधानसभेच्या निवडणुकीच्या (Punjab Assembly Election) मतदानाच्या 48 तास अगोदर 18 फेब्रुवारी रोजी शीख फॉर जस्टिसने लेटर बॉम्ब फोडला होता आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्याशिवाय 'आप'चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांच्यावर निशाणा साधला होता.
भारतात बंदी घातलेली दहशतवादी संघटना शीख फॉर जस्टिसने पत्रात म्हटले होते की, 'आप'चे समर्थन करणारे बनावट पत्र व्हायरल झाल्यानंतर 'आप' नेते राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांनी गुरपतवंत सिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannun) यांना फोन केला होता. पन्नू यांच्या म्हणण्यानुसार, राघव चड्ढा यांनी त्यांना सांगितले की अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान खलिस्तानी रेफरेंडमचे समर्थन करतात.
यापूर्वी, शीख फॉर जस्टिसचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत होते, ज्यात दावा केला होता की शीख फॉर जस्टिसने पंजाबमध्ये आपला सरकार स्थापन करण्यास पाठिंबा दिला आहे. यासोबतच भगवंत मान यांना 'आप'चा मुखमंत्रीपदाचा चेहरा बनवण्यासाठी संघटनेनेही पाठिंबा दिल्याचा दावा या पत्रात केला जात होता, जो शीख फॉर जस्टिसने चुकीचा असल्याचे म्हटले होते.