नवी दिल्ली : शीख गुरूंनी भारतीयांना त्यांच्या भूमीच्या अभिमानासाठी जगायला शिकवले आणि देशाला चांगले आणि विकसित करण्यासाठी प्रेरणा ठरले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले.
गुरू गोविंदसिंग यांच्या सुपुत्रांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ आयोजित ‘वीर बाल दिवस’ कार्यक्रमात मोदी म्हणाले की, आजचा भारत गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडत असून, आजच्या भारताचा आपल्या लोकांवर, त्यांच्या क्षमतांवर, त्यांच्या प्रेरणांवर पूर्ण विश्वास आहे. जोपर्यंत आपण आपल्या वारशाचा आदर करत नाही तोपर्यंत जगानेही आपल्या वारशाची कदर केली नाही. आज जेव्हा आपल्याला आपल्या वारशाचा अभिमान वाटतो तेव्हा जगाचा दृष्टिकोनही बदलला आहे.
तरुणांची अमर्याद स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आमच्या सरकारकडे दृष्टिकोन आणि आराखडा आहे, मग ते कोणत्याही प्रदेशात, समाजात जन्माला आले असोत. पुढील २५ वर्षे तरुणांसाठी भरपूर संधी घेऊन येतील, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला.
अमित शाह यांनी वाहिली आदरांजली
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी शीख गुरू गोविंदसिंग, त्यांचे पुत्र आणि पत्नी माता गुजरी यांना ‘वीर बाल दिवस’ निमित्त आदरांजली वाहिली. अत्यंत धैर्याने ते क्रूर मुघल राजवटीच्या विरोधात उभे राहिले आणि धर्मांतर करण्यास नकार देऊन हौतात्म्य पत्करले. त्यांचे अतुलनीय शौर्य भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे ते एक्सवरील पोस्टमध्ये म्हणाले.