अमृतसर- बैसाखी साजरी करण्यासाठी पाकिस्तानमध्ये गेलेल्या एका भारतीय शीख महिलेने धर्म परिवर्तन करून लाहोरमधील एका व्यक्तीशी लग्न केल्याची घटना समोर आली आहे. पाकिस्तानमधील आयएसआय या गुप्तचर यंत्रणेने तिला अडकवल्याचा दावा महिलेच्या सासऱ्यांनी केला आहे. याप्रकरणी महिलेच्या कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडे मदत मागितली आहे. माझ्या सूनेला आयएसआयने अडकवल्याचा आरोप तिचे सासरे तसरेम सिंग यांनी केला आहे. सुषमा स्वराज यांनी तिला सुखरुप परत आणावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यात राहणारी ३१ वर्षांची किरण बाला ही महिला १२ एप्रिल रोजी पाकिस्तानमध्ये गेली होती. शिरोमणी गुरुद्वारा समितीतर्फे दरवर्षी पाकिस्तानमध्ये तीर्थयात्रेचे आयोजन केलं जातं. या वर्षी १८०० भाविक पाकिस्तानमध्ये गेले आहे. यात किरण बालाचा समावेश आहे. पाच दिवसांपूर्वी किरण बाला बेपत्ता झाली.
किरणच्या घरचे चिंतित असतानाच किरण बालाने पाकिस्तानमधील भारतीय दुतावासाला एक पत्र पाठवून दुसरं लग्न केल्याचा दावा केला आहे. मी लाहोरमधील मोहम्मद आझम या तरुणाशी विवाह केला असून इस्लाम धर्म स्वीकारला आहे. आता भारतात परत येऊ शकत नाही त्यामुळे माझ्या व्हिसाची मुदत वाढवून द्यावी, अशी विनंती तिने पत्रात केली आहे. मोहम्मदशी निकाह केल्यानंतर किरणने नाव बदलले असून अमिनाबिबी असं तिचं नवं नाव असल्याचा उल्लेख पत्रात केला आहे.
किरण बालाच्या पतीचं २०१३ मध्ये अपघातात निधन झालं. किरणला १२ वर्षांची मुलगी आणि दोन लहान मुलं आहेत. किरण बालाने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला फोनवरुन प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही फेसबुकवरुन भेटलो नाही. आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातूनच संपर्कात आलो, असं तिनं सांगितलं. मात्र कोणत्या साईटद्वारे ती पाकिस्तानी व्यक्तीच्या संपर्कात आली,याबद्दल तिने माहिती दिली नाही. हा माझ्या इच्छेने निर्णय घेतला असून माझ्यावर कोणताही दबाव नाही, असं म्हणून तिने फोन कट केला.
माझ्या सुनेला पाकिस्तानात बोलावून तिचं धर्म परिवर्तन करण्यात आलं आहे. त्यातून तिला सोडवावं अशी विनंती मी पतंप्रधान नरेंद्र मोदी व पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना करतो आहे. आयएसआयने तिला अडकलं असल्याचा मला संशय आहे, अशी प्रतिक्रिया किरणाच्या सासऱ्यांनी एनएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे.