उत्तर चीनच्या सीमेवरील चौकीकडे जवानांना घेऊन निघालेला लष्कराचा ट्रक उत्तर सिक्कीममधील झेमा येथे घाटात वळण घेताना ट्रक उतारावरून घसरल्याने दरीत कोसळला. या भीषण अपघातात तीन कनिष्ठ अधिकाऱ्यांसह 16 जवान मृत्युमुखी पडले. या दुर्दैवी अपघातामुळे देशभर शोक व्यक्त करण्यात येत आहे. लष्कराची तीन वाहने शुक्रवारी सकाळी जवानांना घेऊन जात होती. हा ताफा चांटे येथून थांगूच्या दिशेने निघाला होता. झेमा येथील घाटात वळण घेताना एक ट्रक तीव्र उतारावरून घसरून दरीत कोसळला. शहीद जवानांपैकी 4 जवान उत्तर प्रदेशातील आहेत.
जवान चरण सिंह हे ललितपूरच्या सौजना येथील रहिवासी होते. शुक्रवारी चरण सिंह यांच्या जुळ्या मुलांचा वाढदिवसही होता. चरण सिंह यांचे 2011 मध्ये लग्न झाले होते. त्यांना जुळी मुलं आहेत. शुक्रवारी त्यांचा मुलगा सुख सिंह आणि मुलगी नव्या यांचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी सकाळी मुलांशी संवाद साधला. यानंतर सायंकाळी बोलण्याचं आश्वासन देत त्यांनी फोन ठेवून दिला. सायंकाळी मुलांच्या वाढदिवसाचा केक कापण्याची तयारी सुरू होती.
केक कापणार तितक्यात फोन वाजला आणि समोरच्या व्यक्तीने चरण सिंह यांची बस पलटी झाल्याची आणि ते शहीद झाल्याची माहिती दिली. चरण सिंह यांचे मोठे भाऊ बृजपाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, "प्रत्येकजण चरणच्या जुळ्या मुलांच्या वाढदिवसाच्या तयारीत व्यस्त होता. मला सिक्कीमहून युनिट ऑफिसरचा फोन आला. फोनवरच त्यांनी चरण सिंह शहीद झाल्याची माहिती दिली. चरणच्या जाण्याची बातमी आल्यापासून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे."
बृजपाल सिंह यांनी सांगितले की, त्यांचे वडील शेतकरी आहेत आणि ते तीन भाऊ आहेत. जवान चरण सिंह हे तीन भावांमध्ये सर्वात लहान होते. लहान असूनही त्याला त्याच्या आई-वडिलांचे सर्वात जास्त प्रेम होते. 35 वर्षीय चरण सिंह यांची 2004 मध्ये लष्करात निवड झाली होती. सध्या ते सिक्कीममध्ये 26 नायक युनिटमध्ये तैनात होते. दोन महिन्यांपूर्वी चरण सिंह सुट्टीसाठी आल्याचे नातेवाईकांनी सांगितले. 1 डिसेंबरला सुट्टी संपवून ते परत सिक्कीमला गेले. एका हिदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"