गंगटोक- ४५०० फुटांवर बांधण्यात आलेला विमानतळ सिक्किममधील नागरिकांच्या आयुष्यात नवा आनंद घेऊन आला आहे . पाक्योंग विमानतळामुळे ईशान्य भारतातील हे राज्य आता हवाई मार्गाने जोडले जाणार आहे. विशेष म्हणजे सिक्किममध्ये अजूनही रेल्वे आलेली नाही. रेल्वेमार्गांचे काम पूर्ण होण्याआधीच सिक्किममध्ये हवाई सेवा सुरु होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे.
सिवोक ते रांगपो या ४४ किमी रेल्वेमार्गाचे काम सध्या सिक्किममध्ये सुरु आहे. तो पूर्ण होण्याआधीच पाक्योंग विमानतळावर उड्डाणे सुरु होतील. सिक्किम हे एकमेव राज्य होते की ज्यामध्ये आजवर विमानतळ नव्हता. पाक्योंग विमानतळ हा भारत चीन सीमेजवळ असल्यामुळे त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. उडान योजनेअंतर्गत बांधण्यात आलेले हे विमानतळ भारतातील 100 वे विमानतळ ठरले आहे.
हा विमानतळ चीन सीमेपासून केवळ ६० किमी अंतरावर आहे, भारतीय वायूदलाने उद्घाटनाआधीच येथे डोर्नियर २२८ विमान उतरवले आहे. स्पाईस जेट येथे सेवा देण्यास तयार झाली असून येथे कोलकाता-सिक्कीम अशी सेवा सुरु होईल. हे विमानतळ सिक्किमची राजधानी गंगटोक पासून केवळ ३० किमी अंतरावर आहे. हे विमानतळ बांधण्यासाठी ३५० कोटी रुपयांचा खर्च आला आहे.