नवी दिल्ली : डोकलाममधून मागे हटण्याच्या चीनच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे सीमेवर तणाव वाढला असून, भारतानेही सिक्कीम, अरुणाचल प्रदेशांतील सीमेवर सैन्य वाढविले आहे. चीनची खुमखुमी कायम असून, सतत युद्धाची भाषा बोलली जात आहे. त्यामुळे भारतानेही सावध राहण्यासाठी सैन्य वाढल्याचे अधिकाºयांनी सांगितले आहे. दुसरीकडे कोणत्याही संकटाला वा अडचणींचा सामना करायला भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज असल्याचे संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी लोकसभेत स्पष्ट केले आहे.तिबटेच्या काही भागात चीनने आपले सैन्य आणायला सुरुवात केली असल्याच्या वृत्ताकडे लक्ष वेधता जेटली यांनी वरील विधान केले. भारतीय लष्कराकडे कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक ती शस्त्रसामग्री आहे, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज भूतानचे परराष्ट्रमंत्री दामचो दोरजी यांच्याशी चर्चा केली. डोकलामशी संबंधित मुद्द्यांवर त्यांच्या चर्चेचा भर होता,असे सांगण्यात आले. मात्र चर्चेचा तपशील जाहीर करण्यात आला नाही.चिनी सैन्य मागे जाणार नाही; दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांसमोरबीजिंग : भारताशी तडजोड करण्यासाठी चीन आपले सैन्य डोकलाममधून मागे घेईल, अशा बातम्या म्हणजे निव्वळ अफवा आहेत, असे चीनने स्पष्ट केले आहे. चीन आपले सैन्य १00 मीटर मागे घेण्यास राजी झाल्याचे वृत्त अत्यंत चुकीचे असल्याचे परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले.‘चायना डेली’ने दिलेल्या वृत्तानुसार, आपल्या प्रादेशिक हक्कांविषयी कधीही तडजोड करणार नाही, अशी प्रतिक्रिया चीनने दिली आहे. चीनची भूमिका अत्यंत स्पष्ट आणि ठाम असल्याचा दावा या प्रवक्त्याने केला.दोन्ही देशांनी डोकलाममधून सैन्य मागे घ्यावे आणि चर्चा करावी, अशी भूमिका भारताने मांडली आहे. जूनमध्ये हा पेचप्रसंग निर्माण झाला असून, भारत व चीनचे सैन्य सिक्किम, भूतान व चीन या तिघांचा संगम होत असलेल्या डोकलाम भागात समोरासमोर ठाकले आहे.
सिक्कीम, अरुणाचल सिमेवर सैन्य वाढवले, चीनच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 1:53 AM