Sikkim Assembly Election Results : येत्या 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. तत्पुर्वी आज सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. अरुणालच प्रदेशात सलग दुसऱ्यांदा भाजपने एकहाती सत्ता मिळवली, तर सिक्कीममध्ये SKM ने बहुमत मिळवले आहे. दरम्यान, या निवडणुकीत भारताचे दिग्गज फुटबॉलपटू आणि सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट (SDF) चे बारफुंग विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बायचुंग भुतिया(Bhaichung Bhutia) यांना पराभवाचा सामना करावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाचे(SKM) रिक्सल दोर्जी यांनी बायचुंग भुतिया यांचा 4300 हून अधिक मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे, बायचुंग भुतिया यांचा हा गेल्या दहा वर्षातील सलग सहापा पराभव आहे. फुटबॉलचे मैदान गाजवणाऱ्या भुतिया यांना राजकारणाचे मैदान अद्याप गाजवता आले नाही. दरम्यान, भुतिया सध्या एसडीएफचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी 2018 मध्ये स्थापन केलेल्या 'हमरो सिक्कीम पार्टी'चे 2023 मध्ये SDF मध्ये विलीनीकरण केले होते.
राजकारणात सातत्याने मिळाले 'रेड कार्ड'भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार बायचुंग भुतिया यांनी यापूर्वी तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, परंतु दोन वेळा त्यांचा पराभव झाला. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने त्यांना 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दार्जिलिंगमधून आणि 2016 च्या विधानसभा निवडणुकीत सिलीगुडीतून उमेदवारी दिली होती. यानंतर त्यांनी सिक्कीममधील गंगटोक आणि तुमेन-लिंगी येथून 2019 ची विधानसभा निवडणूकही लढवली, पण त्यांना यश आले नाही. 2019 च्या गंगटोकमधील पोटनिवडणुकीतही त्यांचा पराभव झाला.
सिक्कीममध्ये एसकेएमचा मोठा विजयसिक्कीम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवारी सकाळी सुरू झाली. एसकेएमने सिक्कीममध्ये विधानसभेच्या 32 पैकी 31 जागा जिंकल्या आहेत. सिक्कीममधील सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाचा (SKM) हा सलग दुसरा आणि मोठा विजय आहे. एक जागा एसडीएफच्या खात्यात गेली, तर भाजप-काँग्रेससह इतरांना खातेही उघडता आले नाही.
भारतासाठी 48 गोल भारतीय फुटबॉल संघाच्या पुनरुत्थानाचे श्रेय बायचुंग भुतिया यांना जाते. युरोपियन क्लबचे प्रतिनिधित्व करणारे ते पहिला भारतीय फुटबॉलपटू देखील होते. भारतासाठी त्यांनी 48 केले असून, सुनील छेत्रीनंतर देशासाठी सर्वाधिक गोल करणारे दुसरा खेळाडू आहेत.