गंगटोक: उत्तर सिक्कीममधील लोनाक सरोवरावर परिसरात बुधवारी ढगफुटीसदृष पावसामुळे मोठे नैसर्गिक संकट निर्माण झाले आहे. या ढगफुटीमुळे तीस्ता नदीच्या पात्रात अचानक पूर आला, ज्यात जवळपास 14 लोकांचा मृत्यू झाला तर 22 लष्करी जवानांसह 100 हून अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. सिक्कीममधील या आपत्तीनंतर, मदत आणि बचाव कार्यात गुंतलेल्या भारतीय लष्कराने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.
उत्तर सिक्कीमबद्दल माहितीसाठी, 8750887741, पूर्व सिक्कीमसाठी 8756991895 आणि बेपत्ता सैनिकांच्या माहितीसाठी 7588302011 वर संपर्क साधता येईल. दरम्यान, चुंगथांग धरणातून पाणी सोडण्यात आल्याने पहाटे दीडच्या सुमारास सिक्कीममध्ये आलेल्या पुराची स्थिती आणखी बिकट झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्याची राजधानी गंगटोकपासून ३० किमी अंतरावर असलेल्या सिंगतममध्ये इंद्रेणी ब्रिज म्हणून ओळखला जाणारा एक स्टील पूल बुधवारी पहाटे तिस्ता नदीत वाहून गेला.
गंगटोकचे उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) महेंद्र छेत्री म्हणाले, 'गोलिटर आणि सिंगतम भागातून पाच मृतदेह सापडले आहेत.' अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृतांपैकी तीन उत्तर बंगालमध्ये वाहून गेले आहेत. आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, लष्करी जवानांव्यतिरिक्त, 80 हून अधिक नागरिक अद्याप बेपत्ता आहेत, तर 18 जखमींसह 45 लोकांना वाचवण्यात आले आहे. भारतीय लष्कर आणि प्रशासनाने बचावकार्य आणि शोधमोहिम सुरु केली आहे.
दुसरीकडे, या नैसर्गिक आपत्तीचे काही सॅटलाईट फोटो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने (ISRO) जारी केले आहेत. इस्रोच्या टेम्पोरल सॅटेलाइट हे फोटो जारी केले आहेत. 17 सप्टेंबर आणि 28 सप्टेंबर रोजी घेतलेल्या छायाचित्रांमध्ये तलावाची स्थिती दाखवण्यात आली आहे. बुधवारी 4 ऑक्टोबर सकाळी सहा वाजता काढलेले चित्र पाहता तलावाचा आकार निम्म्यावर आल्याचे दिसून येत आहे. 100 हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पसरलेले पाणी वाया गेले असून आता केवळ 60.3 हेक्टर क्षेत्रावरच पाणी उपलब्ध आहे.