नवी दिल्ली - सिक्किम येथील बर्फाच्छादित प्रदेशात अडकलेल्या 2500 नागरिकांची भारतीय सैन्याकडून सुटका करण्यात आली आहे. भारतीय सैन्याने सिक्कीममधील नाथू ला या बर्फाळ प्रदेशात अडकलेल्या पर्यंटकांना सुखरुपस्थळी पोहोचवले. नाथू ला आणि जवळील प्रदेशात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे पर्यटनासाठी आलेले हजारो पर्यटक येथे अडकून पडले होते.
सिक्कीम म्हटलं की पर्यटन आलंच. त्यात, पावसाळ्यानंतर सगळीकडे हिरवळ पसरली असल्याने पर्यटकांचा जोर या मोसमात वाढतो. त्यामुळेच सिक्कीममध्येही पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. येथील नाथू ला दरी व जवळील प्रदेशात अनेक पुरुष पर्यंटकांसह महिला आणि लहानमुलेही अडकली होती. त्यावेळी, भारतीय जवानांनी जवळपास 2500 पर्यटकांना या बर्फवृष्टीपासून बचाव केला. अनेक पर्यटक या परिसरात आपल्या वाहनांसह अडकले होते. जवळपास 300 ते 400 वाहने या बर्फवृष्टीमध्ये अडकले होते. भारतीय सैन्याला याबाबतची सूचना मिळताच, लष्कराने मिशन बचाव हाती घेऊन सर्वांची सुखरुप सुटका केली. त्यानंतर, या सर्वच पर्यटकांना अन्न-पाणी, कपडे आणि औषधोपचार देण्यात आले. भारतीय सैन्याच्या या धाडसी कामगिरीमुळे पर्यटक भावूक बनले होते. तर, भारतीय सैन्याच्या आभार शब्दात मानता येणं शक्य नसल्याच्या भावनाही अनेकांनी बोलून दाखवल्या.