मुंबई: आज देशासाठी ऐतिहासिक दिवस आहे. आज देशाला 100 वं विमानतळ मिळालं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल सिक्किममध्येविमानतळाचं लोकार्पण करताना म्हटलं. मोदींनी काल सिक्किममध्ये पाकयोंग विमानतळाचं उद्धाटन केलं. भाजपा सरकारच्या काळात वेगानं विमानतळांची कामं मार्गी लागत असल्याचं मोदींनी म्हटलं. मात्र मोदींनी सांगितलेला विमानतळांचा आकडा पूर्णपणे चुकीचा आहे. देशातील एकूण विमानतळांची संख्या सव्वाशेहून अधिक आहे. पंतप्रधान मोदींनी फक्त देशातील कार्यान्वित असलेल्या विमानतळांचा आकडा सांगितला, असं लक्षात घेतलं तरीदेखील आकडेवारी जुळत नाही. कारण मोदींनी सांगितलेली आकडेवारी आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे उपलब्ध असलेली आकडेवारी यात मोदी तफावत आहे. पाकयोंग हे देशातील शंभरावं विमानतळ आहे, या मोदींचा दावा डीजीसीएच्या (नागरी विमान उड्डाण संचलनालय) आकडेवारीनंदेखील खोटा ठरवला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही संस्था सरकारच्या अखत्यारित येतात. नागरी विमान उड्डाण संचलनालय (डीजीसीए) देशातील नागरी उड्डाणाचं नियंत्रण करतं. तर भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) देशातील विमानतळांच्या उभारणीचं, त्यांच्या देखभालीचं आणि व्यवस्थापनाचं काम करतं. नागरी विमान उड्डाण संचलनालयची आकडेवारी काय सांगते?नागरी विमान उड्डाण संचलनालयाच्या 2017-18 च्या अहवालानुसार, देशातील एकूण विमानतळांची संख्या 129 इतकी आहे. यामध्ये 23 आंतरराष्ट्रीय, 78 देशांतर्गत, 8 कस्टम विमानतळांचा समावेश आहे. तर 20 विमानतळं संरक्षण दलांकडे आहेत. हा अहवाल डीजीसीएनं 5 सप्टेंबर 2018 रोजी प्रसिद्ध केला आहे. देशातील 129 विमानतळांपैकी 101 विमानतळं वापरात आहेत.
मोदींची 'शंभर नंबरी' चूक; सिक्किम देशातलं शंभरावं विमानतळच नाही?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 2:46 PM