Rahul Gandhi on PM modi: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अदानी मुद्द्यावरून घेरले. याला निमित्त ठरलं ते अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान मोदींना विचारण्यात आलेला अदानींबद्दलचा प्रश्न! पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना मोदींनी तो खासगी मुद्दा असल्याचे सांगितले. त्यावर बोट ठेवत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची बैठक झाली. दोन्ही नेत्यांमध्ये उभय देशांतील आर्थिक संबंध वृद्धिंगत करण्याबरोबरच सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला. बैठकीनंतर मोदी-ट्रम्प यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी पत्रकाराने अदानी प्रकरणाबद्दल प्रश्न विचारला.
राहुल गांधी काय म्हणाले?
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, "देशात प्रश्न विचारला की मौन, परदेशात प्रश्न विचारला की, खासगी मुद्दा. अमेरिकेमध्ये मोदीजींनी अदानीजींच्या भ्रष्टाचार प्रकरणावर पडदा टाकला."
"जेव्हा मित्राचा खिसा भरणे मोदीजींसाठी राष्ट्र निर्माण आहे. तेव्हा लाचखोरी आणि देशाची संपत्ती लुटणे व्यक्तिगत प्रकरण बनतो", असा टोला राहुल गांधींनी मोदींना लगावला.
अदानी प्रकरणाबद्दल काय विचारण्यात आला प्रश्न
संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींना एका पत्रकाराने विचारले की, ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये गौतम अदानींच्या प्रकरणावर काही चर्चा झाली का?
या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, 'व्यक्तिगत प्रकरणांवर आमच्यामध्ये कोणतीही चर्चा झाली नाही. आमचे संस्कार आणि संस्कृती वसुधैव कुटुम्बकम अशी आहे. आम्ही संपूर्ण विश्वाला एक कुटुंब मानतो. प्रत्येक भारतीयाला मी माझा मानतो. अशा खासगी मुद्द्यासाठी दोन देशांचे प्रमुख बसत नाहीत, बैठत नाही आणि बोलतही नाहीत", असे मोदी म्हणाले.